पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला नाशिक जिल्ह्यातून आलेल्या कुटुंबियांना देवळात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या पूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यामुळे भाविक संतप्त झाले असून शासनाने हस्तक्षेप करुन अशा उद्दाम कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याची मागणी करु लागले आहेत.


नाशिक जिल्ह्यातील सोनवणे आणि येवलेकर कुटुंब दर्शनासाठी पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आले होते. दर्शन घेताना त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा खाली पडल्याने प्रियांका येवलेकर या महिला त्याला घेण्यासाठी थांबल्या असता सुरक्षारक्षकानी त्यांना धक्काबुक्की सुरु केली.

यावेळी सनी सोनवणे याने जाब विचारलं असता वादावादी सुरु झाली आणि मंदिरात सनी सोनवणे यास मारहाण करण्यात आली. या झटापटीत सनीच्या आई आणि बहिणीलाही धक्काबुक्की झाली आणि यात त्यांचे मंगळसुत्रही तुटले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावा उपस्थित भाविकांनी केला आहे. मंदिर प्रशासनाकडून यावर कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

मंदिरातील कर्मचाऱ्यांना आकृतीबंध मंजुर करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे पगार वाढवले, मात्र या कर्मचाऱ्यांची थेट भाविकांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात असेल तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असा सवाल वारकरी सांप्रदायाचे रामकृष्ण वीर यांनी केला आहे.