मुंबई : सध्या राज्यात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत त्या चिंताजनक आहे. या पेक्षा चिंताजनक म्हणजे मुख्यमंत्र्याचे मौन आहे. राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे राज्यात घडत असलेल्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाही, असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाविकासआघाडी सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत राज्यातल्या भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणांवर काही बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. राज्यपालांना भेटून आम्ही मागणी केली की, राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडून अहवाल घेतला पाहिजे.
शरद पवारांनी पाठीशी घातली आहे. आरोप होत असलेल्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे. कॉंग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची भूमिका नाहीच. सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. सत्तेच्या हव्यासापोठी महाविकासआघाडी सरकारचं काम सुरू आहे. सत्तेमध्ये जेवढा हिस्सा आहे तेवढाच हफ्तावसुलीमध्ये हिस्सा आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी कॉंग्रेसला केला आहे.