नागपूर : उद्धव ठाकरे ज्या सरकारचं नेतृत्व करतात ते सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. राज्यातल्या काही मंत्र्यांना वसुलीचं सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. कोणाकडून किती वसुली करायचं याची नोंद त्यामध्ये ठेवली जाते असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस बोलत होते.
राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण ती लपवून त्यामागे तत्वज्ञान उभं करणं हे चुकीचं आहे. भाबडेपणाचा मुखवटा आता उद्धव ठाकरेंनी दूर करावा अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निराशा बाहेर आली. राज्यातल्या काही मंत्र्यांना वसुलीचं सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. कोणाकडून किती वसुली करायचं याची नोंद त्यामध्ये ठेवली जाते. पंतप्रधान हे यंत्रणांच्या गैरवापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत. जर यंत्रणेचा गैरवापर केला असता तर अर्ध मंत्रिमडळ तुरुंगात गेलं असतं. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी शांत बसणार नाहीत."
मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही डाव्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी भारताचे संविधान बदलण्याचा डाव आखल्या असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे ज्या सरकारचं नेतृत्व करतात ते राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. शेतकऱ्यांना मदत करताना यांच्याकडे पैसे नसतात. काहीतरी कारणं सांगत पाठ दाखवली जाते. यांनी जो भ्रष्टाचार चालवला आहे त्यामुळे ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहेत."
आम्हाला जनतेच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं जातं. ज्यावेळी सरकार पडणार त्यावेळी यांना समजणारही नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या :