मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण, तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, कथित ऑडिओ संभाषणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती बरी नसल्यानं हजर राहणार नसल्याची माहिती रामदास कदम यांनी दिलीय.


परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कदम यांनी केलेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांच्याविषयी शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात प्रवेश मिळणार की नाही याविषयी चर्चा रंगली होती. पण प्रकृती बरी नसल्याचं सांगत कदम यांनी दसरा मेळाव्याला जाणं टाळलंय.


Tejas Thackeray | आजच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंचं लाँचिग होणार?


रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशा प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदमांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांची आहे. त्यामुळे या दसरा महामेळाव्याला रामदास कदम यांना प्रवेश नसेल असंही काही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता स्वतः रामदास कदम यांनीच प्रकृती बरी नसल्याचं सांगत दसरा मेळाव्याला येणार नसल्याचं सांगितलंय.


उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष
दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नवीन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.