मुंबई : गेल्या दहा वर्षात आमचं सरकार असतानाच मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. त्या आधीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलं नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लागावं अशी ठाकरे-पवारांची इच्छा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणसाठी आंदोलन सुरू आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. ते ठाम भूमिका घेत नाहीत. तुमची कायदेशीर भूमिका काय आहे ते सांगा. ते समाजासमाजात भांडण लावत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहेत असं फडणवीस म्हणाले.
शासनाची भूमिका सहकार्याची
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शासनाची भूमिका सहकार्याची आहे. एखादं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असेल तर त्याला सहकार्य करणे, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर वाहतूक कोंडी होत आहे. काही लोक आडमुठेपणामुळे वागतात आणि पूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं, त्याची खबरदारी घ्यावी."
न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्यवाही करेल
उच्च न्यायालयाने काही बंधने घालून दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करत आहे असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी एक दिवस वाढवून मागितला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस त्यावर कार्यवाही करतील. प्रशासन त्या संदर्भात सकारात्मक विचार करेल."
मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मागण्यांवर कायदेशीर आणि संविधानातील मार्ग काढावा लागेल. त्यासाठी एक समिती नेमली आहे असं फडणवीस म्हणाले. लोकांना कुठेही त्रास होईल असं कुणीही वागू नये. चर्चेतून मार्ग निघेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी-मराठ्यांमध्ये विरोधक भांडण लावतात
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत अशी आपली इच्छा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आम्हीच केलंय. या समाजात उद्योगासाठी मदत केली आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या योजना राबवल्या आहेत. मराठा समाजासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत."
काही लोक जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी तसं करू नये, नाहीतर त्यांचं तोंड भाजेल. एकाला समोर करायचं, दुसऱ्याला नाराज करायचं. नंतर त्याला पुन्हा समोर करायचं. एकमेकांमध्ये लढवायचं हे काम काही लोकांचं सुरू आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.
समिती मागण्यांचा विचार करेल
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया काय आहे याचा समिती विचार करेल. या कमिटीला शासनाचे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे या समितीचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा निर्णय असेल."