Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai Morcha) रवाना झाला होता. आज, 29 ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. हलगीच्या तालावर आंदोलनकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. तर काही आंदोलनकर्ते थेट रेल्वे रुळावर उतरले होते. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच सीएसएमटी स्थानकावर आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे.

CSMT वरच्या माकडांना आवरा : मनोज जरांगे

मनोज जरांगे म्हणाले की, रस्त्यावरील गाड्या मोकळ्या करा. मुंबई जाम करू नका. सीएसएमटीवर कोणाचे पोरं आहेत? कोण गोंधळ घालतंय? तुम्ही माजलेली औलाद दिसताय.  २५-३० लोकांमुळे अडचण निर्माण करू नका. ते लोक आपली नाहीत.  सीएसएमटीचे कोण लोक आहेत ते बघा आणि त्यांना समजावून सांगा. त्यांना म्हणा लवकर गाड्या काढा. सीएसएमटीला जाऊन या कोण आहेत ते पोरं ओळखा. सीएसएमटीवरच्या माकडांना आवरा, असे त्यांनी म्हटले आहे. 

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता 

मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजेपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या भागात गणपती भक्तांचीसुद्धा मोठी गर्दी असते. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तातडीने आज शासनाचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात नेमकं कोण कोण असणार? याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा...13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

आणखी वाचा 

Vijaysinh Pandit meet Manoj Jarange Patil : हाकेंसोबत जोरदार राडा झाल्यानंतर विजयसिंह पंडित जरांगेंच्या भेटीला आझाद मैदानावर पोहोचले; म्हणाले, अजून वातावरण...