मुंबई: मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच देशमुख आता बेलवर बाहेर आहेत असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह काही नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
माझ्या नादी लागणाऱ्याला सोडत नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुखांनी या आधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही. मला देशमुखांना एकच सांगायचं आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही.
देशमुख जेमध्ये गेले, आता बेलवर बाहेर आहेत
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. त्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख त्यानंतर जेलमध्ये गेले. आताही ते बेलवर बाहेर आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता असा आरोप करण्यात आला आहे. महाजनांवर खोटे गुन्हे दाखल करायला लावले याचे ऑडिओ व्हिज्युएल पुरावे आपण दिले होते. ते पुरावे सीबीआयने कोर्टात दाखल केले. महाविकास आघाडी सरकारने विरोधी आमदारांवर कशा प्रकारे मोक्का लावण्याचा प्रयत्न केला हे यावरून दिसतंय.
शाम मानव सुपारीबाजांच्या नादी लागले का?
अनिसचे प्रमुख शाम मानव यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी मला एकदा विचारायला हवं होतं. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचं काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला शाम मानव लागले का हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: