मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजय अशर यांची मित्रा संस्थेतून झालेली गच्छंती म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याच मोठा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रताप सरनाईक यांच्या नेमणुकीमुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही दुरावा नसल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्यात कोणताही दुरावा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीरपणे स्पष्ट केले. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद नसून दुरावा वाढण्याच्या बातम्यांची सुरुवात एका महिन्यापूर्वी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोघांसाठी एक मोठा धक्का मानली जात होती. मात्र एका महिन्याच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घेत प्रताप सरनाईक यांची नियुक्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे.
फडणवीसांकडून परंपरेला ब्रेक
बहुतांश वेळेस राज्याचे परिवहन मंत्री हेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. 2014 ते 2019 मध्ये दिवाकर रावते हे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्याकडे मंत्रिपदची आणि अध्यक्षपदाची जबाबदारी होती. हीच परंपरा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कायम ठेवण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे हेच राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या परंपरेला ब्रेक दिला होता.
महामंडळ अध्यक्षपदाचा निर्णय मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य अप्पर सचिव संजीव सेठी यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तसेच मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतंच परिवहन खातं राहणार अशी चर्चाही जोर धरू लागली होती. पण शुक्रवारी मध्यरात्री अचानक सूत्रे फिरली. मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला. सरनाईक यांच्या नियुक्ती पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. आता अधिकृतरित्या ही माहिती कधी सांगितली जाईल याची प्रतीक्षा आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांत एसटीच्या बस प्रवासात 14.95 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर दरवाढीवरुन राज्यभरात प्रवाशांची तीव्र नाराजीची लाट उसळली होती. तसेच विरोधकांनीही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. एसटीमध्ये मिळणाऱ्या सवलतीवरून केलेला वक्तव्य देखील चांगलं चर्चेत आलं होतं.
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आयएएस अधिकाऱ्याकडे दिल्यानंतर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या काळात दिल्या गेलेल्या अनेक कामांना स्थगिती दिली होती. त्यातच एमएमआरडीए मध्ये देखील घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अजिबात समन्वय नसून दोघांमध्ये वाद असल्याचं विरोधकांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद पुन्हा प्रताप सरनाईक यांना दिल्याने एका झटक्यात दोघांमधील दुरावा संपल्याचे मूकपणे जाहीर केले आहे.
ही बातमी वाचा: