Devendra Fadanvis On Uddhav Thackeray :  मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment) मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार पलटवार केला आहे. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. धारावीतील (Dharavi) लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न ठाकरे करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.


विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असेही फडणवीस म्हणाले.


उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनी पत्राद्वारे सरकारला सुचवली. धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदादेखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. यातील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारने तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजीटल पद्धतीने करावी लागणार, हा बदल आम्ही केला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरेंनी काय म्हटले होते?


काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अदानी समूहावर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, धारावीचा विकास झाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. धारावीच्या पुनर्विकासाबाबत संशय व्यक्त होत आहे. धारावीत असणाऱ्या व्यावसायिकांनादेखील जागा मिळाल्या पाहिजेत. 


अभ्युदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन हे देखील अदानीला देण्यात येणार आहे अशी माहिती मिळली  आहे. केवळ अदानीसाठी सगळं सुरू आहे. वीज बिलाचे कंत्राट देखील अदानीला देण्यात आलं आहे. याचा आता सोक्षमोक्ष लावायचा आहे. सगळं अदानीला कसं काय? आहे. सगळे उद्योग गुजरातला घेऊन जात आहात मग मुंबईला काय उकिरडा करणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून अदानी समूहाच्या कार्यालयावर 16 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.