Washim Poharadevi : समाज जीवनात एखादा दिवस संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचा असतो आणि आज बंजारा समाजासाठी तसाच दिवस होता. पोहरादेवीमध्ये अनेक विकासकामांचं स्वप्न बंजारा समाजाचे सर्वात प्रमुख धर्मगुरू रामराव महाराज यांनी पाहिले होते. आज ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi) यांच्या पोहरादेवीच्या दौऱ्याच्या निमित्ताने पूर्ण होत असताना, बंजारा समाजाचे विद्यामान धर्मगुरू कबीरदास महाराज (Kabirdas Maharaj) यांच्यावर दुःखाचा एक डोंगर कोसळला होता.
पंतप्रधान मोदी पोहरादेवीला पोहोचण्याच्या वेळी म्हणजेच दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कबीरदास महाराज यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, ही बातमी सामान्य बंजारा बांधवांना कळली तर आजच्या कार्यक्रमाचा उत्साह आणि आनंदाच्या दिवसावर विरजण पडेल, या भावनेने कबीरदास महाराज यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती अनेक तास समाज बांधवांपासून लपवून ठेवली.
ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूर्ण कार्यक्रमात उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी कोणालाही त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा कसा डोंगर कोसळला आहे, हे कोणाला ही कळू दिले नाही. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीतून निघून गेल्यानंतर आणि बंजारा समाजाचा आनंदाचा दिवस पार पडल्यानंतर कबीरदास महाराजांनी त्यांचं दुःख सर्वांसमोर मांडलं आहे. आणि त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती सर्वांना दिली आहे.
काँग्रेसने बंजारा समाजाला मुख्य धारेपासून वेगळं केलं- नरेंद्र मोदी
ज्यांना आजतगायत कोणी विचारलं नाही, त्यांना हा नरेंद्र मोदी आज पूजतो आहे. बंजारा समाजाने भारताच्या निर्मितीत, इथल्या संस्कृतीत फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कला, संस्कृती, राष्ट्रभक्ती, व्यापार इत्यदी प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाच्या महापुरुषांनी, महान विभूतींनी देशासाठी काय नाही केलं? अनेकांनी समाजासाठी आपले सर्वस्व त्यागले. आमच्या बंजारा समाजातील कित्येक साधुसंत, महंतांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मासाठी नवी चेतना दिली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी या संपूर्ण समाजाला अपराधी घोषित केलं होतं. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाची जबाबदारी होती की, बंजारा समाजाची चिंता केली पाहिजे, त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. मात्र तसे झाले नाही. त्यावेळच्या काँग्रेस (Congress) सरकारने नेमकं काय केलं? काँग्रेसच्या त्यावेळच्या सरकारने उलट या समाजाला मुख्य धारेपासून वेगळं केलं.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टीवर ज्या परिवाराने ताबा मिळवला. त्यांची विचारधारा ही आधीपासूनच विदेशी राहिली आहे. त्यांना कायम वाटत राहिले आहे की, भारतावर कायम एका कुटुंबाचीच मक्तेदारी राहिली पाहिजे. कारण हा हक्क त्यांना ब्रिटिशांनी दिला होता. म्हणून त्यांनी बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाशिमच्या (Washim) सभेतून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
हे ही वाचा