Bhalchandra Nemade : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठी भाषेला (Marathi language) अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला.  केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्राने त्याचप्रमाणे कला, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तसेच आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. 


मराठी भाषेला अभिजात दर्जा वैगरे या गोष्टी राजकीय असल्याचं रोखठोक मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे. अवघ्या काहीच दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. दरम्यान या सगळ्याला फार महत्त्व देऊ नये असंही मत नेमाडेंनी व्यक्त केलं आहे. 


भालचंद्र नेमांडेंनी काय म्हटलं?


बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भालचंद्र नेमाडेंनी म्हटलं की, मराठी भाषेला अभिजात दर्जा वैगरे या गोष्टी राजकीय आहेत. सगळ्याच भाषा या समृद्ध आहेत. याची सुरुवात तामिळ लोकांनी केली. त्यामुळे मग ते असं झालं की, तामिळने हे केलं मग कानडीनेही केलं. त्यानंतर मल्याळम असं करत सगळ्यांनाच असं वाटतंय की आपण अभिजातच आहोत मग आपणही का करु नये? 


पुढे त्यांनी म्हटलं की, "सरकारी धोरणच असं असावं की आपल्या सगळ्याच भाषा अभिजात आहेत. या निर्णयाचा एकच फायदा की त्यातून ग्रँट मिळते. नुसता अभिमानासाठी आहे की भाषा जुनी आहे, त्याच्यात फार काही अर्थ नाहीये. सगळ्याच भाषा जुन्या आहेत. त्यामुळे हे सगळं पॉलिटीकल असतं. त्यामुळे याला फार महत्त्व देऊ नये, या मताचा मी आहे."


मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. पण अगदी निवडणुकांच्याच तोंडावर हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आल्याने यावर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता भालचंद्र नेमाडेंच्या या वक्तव्यामुळेही नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.                                           


ही बातमी वाचा : 


Raj Thackeray : 'मातृभाषेचा हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा...', मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार