सोलापूर : मित्राने बेईमानी केली,असंगांशी संग केला आणि सत्ता गेली, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात बोलताना केलं आहे. अनैसर्गिक युती केलं की काय होतं ते सोलापुरात पाहिलं. नेत्यांचे फोटो टाकले नाही म्हणून धुमचक्री झाली, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तांतराच्या चर्चेबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तातरांकडे डोळे लावून बसलो नाहीये. हे सरकार नाकर्ते आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. आम्ही सातत्याने सरकारचे लक्ष वेधण्याचं काम करत आहोत. फार काळ असा असंगांचा संघ टिकणार नाही. सत्तांतरासंदर्भात दानवे, दरेकर याना विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले. ज्या दिवशी सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असंही ते म्हणाले.


फडणवीस म्हणाले की,  आपल्या वक्तव्यावरून रोज पलटी खाणारे हे महाराष्ट्र सरकार आहे. शेतकऱ्यांना मदत करतो म्हणाले मात्र अजून अनेकांना मदत मिळालेली नाही, असं फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या काळात एकाही घटकाला यांनी मदत केली नाही. आपल्यापेक्षा छोट्या राज्यांनी गरीबांना मदत केली. महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे मदत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही वीज मंडळाचं काम चांगलं चालवलं
ते म्हणाले की, राज्यात सरकार विरोधात रोष आहे. कोरोनाच्या काळात जिथे निवडणुका झाल्या तिथं आम्ही जिंकलो.  जनतेला कर्मयोगी आवडतात, बोलघेवडे आवडत नाहीत. महाराष्ट्रात बोलघेवडे, विजेच्या बिलाबाबत बोलतात एक करतात एक, असाही टोला त्यांनी लगावला. वीजबिलाबाबत ते म्हणाले की,  तीन मंत्री घोषणा करतात, आणि पुन्हा वीजमंत्री म्हणतात वापरलेलं आहे ते तरी बिल भरा. विजबिलाबाबत गोड बातमी देणे दूर, वीज कनेक्शन कट करत असल्याचं सोलापुरातील यंत्रमाग धारकांनी सांगितलं, असंही ते म्हणाले.फडणवीस म्हणाले की, वीज बिल चौकशी लावायची लावा. मी खात्रीने सांगतो त्यांच्यापेक्षा आम्ही वीज मंडळाचं काम चांगलं चालवलं. वीज सर्वात कमी पैशाने खरेदी केली. वापर नसताना बिल वसूली करण्यासाठी आम्ही सावकारी प्रवृत्तीचे नाहीत, असंही ते म्हणाले.


मोदींच्या नावाने शंख वाजवायचा काम
ते म्हणाले की, अँटिइन्कम्बसीमुळे सरकार पडेल असं बोललं जातं होतं.  त्यावेळी लोक मला सांगत होते, उमेदवार कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, आम्ही मोदींना बघून देत आहोत. आव्हानाचा परिस्थितीत माणसाला जगता यावं यासाठी पॅकेजमधून मोदींनी मदत केली. त्याचा परिणाम म्हणून बिहारमध्ये निवडणुकात विजय मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात अनेक नेते, मुख्यमंत्री केंद्राकडे बोट दखवून, मोदींच्या नावाने शंख वाजवायचा काम करत होते. त्यावेळी  भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन, लोकांसाठी कार्य केले. मोदींनी आत्मनिर्भर पॅकेज देऊन गरीब, मजूर, छोटे उद्योग मदत मिळली पाहिजे म्हणून काम केलं असल्याचंही ते म्हणाले.


फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टीमुळे सोलापुरात पिकांच्या नुकसानसह जमीन खरडून गेली, मोठं नुकसान झालं.  मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही. हे तेच सरकार ज्याच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की, 25 ते 50 हजार मदत मिळाली पाहिजे. सरकार वर्ष पूर्ण करत आहे मात्र सांगण्यासारखं काही नाही. सरकार फक्त स्थगिती दिलेली माहिती देऊ शकेल, असा टोला त्यांनी लगावला.