मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर, 'भारत माता की जय' म्हणणारच : फडणवीस
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2016 09:40 AM (IST)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भारत माता'च्या जयघोषाबद्दल केलेल्या विधानाचे आज सभागृहात जोरदार पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानाबाबत माफी मागण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगीही रंगली. पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल नाशिकच्या भाजप कार्यकारिणीत आपण मुख्यमंत्री म्हणून भाषण केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला. यावर उत्तर देताना संघात मला फक्त राष्ट्रवाद शिकवला. या देशाच्याविरोधात जे बोलले त्यांच्याविरोधात मी बोललो, तर माझं काय चुकलं? असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर.. मी आपल्या विधानावर ठाम आहे, असं म्हणत माझी खुर्ची गेली तरी चालेल., पण मी माफी मागणार नाही., असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ज्यांना भारत माता की जय म्हणायचं नाही., त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही., असं विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं., ज्यावरुन हा सर्व वाद रंगलाय. तसंच "माझं भाषण पूर्ण ऐकलं असतं, तर हा विषय निघालाच नसता. काही लोकांना जाणीवपूर्वक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या देशाविषयी प्रेम नाही . वाघा बॉर्डरवर दोनच नारे असतात, एक 'भारत माता की जय' आणि दुसरा 'वंदे मातरम'. 'भारत माता की जय' हा धार्मिक मुद्दा नाही", असं मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस माफी मागा : विखे पाटील यावेळी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. "भारत माता की जय' वरुन लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे. सरकार आम्ही राष्ट्रवादाचा ठेका घेतला असे वागत आहेत. समाजात, धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यापुढे अनेक समस्या आहेत.सरकारचा निषेध करतो, सभात्याग करतो", असं विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं उत्तर मी 'भारत माता की जय' बोललो म्हणून माफी मागायची का? अल्पसंख्यनक समाजाची माफी तुम्ही मागितली पाहिजे. केवळ मतांच्या राजकारण करता. माझं मुख्यमंत्रीपद राहीलं काय गेलं काय, 'भारत माता की जय' मी म्हणतच राहीन, असं उत्तर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिकमध्ये काय म्हणाले होते मुख्यमंत्री? “देशात राहायचं असेल तर ‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल. ज्यांना 'भारत माता की जय' म्हणायचं नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची कार्यक्रमात ते बोलत होते. VIDEO: