कोल्हापूर : कोल्हापुरातील बिंदू चौकात पाण्याच्या टँकरवरुन तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या तलवार हल्ल्यात तिघे जण जखमी झाल्याचं कळतं आहे.
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.
काल रात्री गंजी गल्ली परिसरात पाण्याचा टँकर आला असताना बाराईमाम आणि भोई गल्ली परिसरातल्या तरुणांमध्ये पाण्यावरुन वाद झाला. पण त्या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठांनी तो वाद मिटवला.
बाराईमाम आणि भोई गल्ली इथल्या तरुणांच्या दोन गटांत झालेल्या तलवार हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या तरुणांनी परिसरात प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांची फौज घटनास्थळी आल्याने हल्लेखोर पसार झाले.
त्यानंतर दोन्ही गटांचे तरुण बिंदू चौकात जमा झाले. यावेळी काही तरुणांनी एकमेकांवर तलवारीने हल्ला केला. ज्यात तिघे जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
या हाणामारीत तौसिफ आरिफ मोमीन, झाकीर सय्यद मोमीन, हाकिब मुसा सौदागर हे तरुण जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.