Devendra Fadnavis Maharashtra CM मुंबई : एकदा नव्हे तर दोन वेळा हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास सोडायला लागला तर एखाद्या नेत्याची अवस्था काय होऊ शकेल? या गोष्टीचा फायदा घेऊन एक तर त्याला राजकारणातून संपवलं जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल. याच गोष्टी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्या बाबतीतही करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण जिद्द, संयम आणि राजकीय डावपेचाच्या जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाटावर पुन्हा झळाळून उठले. 'मी पुन्हा येईन' असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खरोखरच पुन्हा आले. आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वात एकट्या भाजपने 132 जागा तर जिंकल्याच महायुतीनेही 234 ठिकाणी विजय मिळवला. पण ही कमाल काही पहिल्यांदाच नाही. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014, 2019 आणि आता 2024 साली, सलग तीन वेळा 100 हून अधिक जागा जिंकण्याची किमया केलीय. लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर फडणवीस संपले अशी चर्चा सुरू झाली होती. पण चलाख फडणवीसांनी चाणाक्ष खेळी केली आणि अवघ्या चारच महिन्यात जोरदारह कमबॅक केलं.
पाच वर्षांचा संयम
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी पाच वर्षांची वाट पाहावी लागली आहे. 2019 साली पूर्ण बहुमत मिळालं असतानाही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा'. आता तेच शब्द फडणवीसांनी खरे करून दाखवले. अगदी तरुण वयात नागपूरचे महापौर होण्याचा विक्रम हा देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आहे. वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातले पहिलेच मुख्यमंत्री ठरले आणि त्यांनी पाच वर्षेही पूर्ण केली.
विरोधी पक्षनेता म्हणून दमदार कामगिरी
2019 साली भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलं आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले. महाविकास आघाडी सरकार हे अडीच वर्षे टिकलं. अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचा फज्जा उडाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अधिक सजग झाले आणि त्यांनी ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली. त्या काळात हताश न होता देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सुरूच ठेवलं. इतर नेत्यांप्रमाणे उताविळ न होता त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. 'मी पुन्हा येईन' असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा जास्त काही प्रयत्न केला नाही. अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार पडेल असं फडणवीस सातत्याने म्हणायचे. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणीसांनी जे काम केलं त्याला तोड नव्हती. कोरोना काळात त्यांनी अनेक दौरे केले, अनेक ठिकाणी भेटी दिल्या. जनतेमध्ये थेट जायला प्राधान्य दिलं. त्याची चर्चा जरी जास्त झाली नसली तरी देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सोडलं नाही.
राज्यसभेच्या निवडणुकीत पहिला झटका दिला
विरोधी पक्षनेते असतानाही देवेंद्र फडणवीसांनी संयम सोडला नाही. जून 2022 साली झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमाचा असा काही प्लॅन केला की कुणाच्या ध्यानीमनी नसतानाही भाजपचे धनंजय महाडिक निवडून आले. त्यावेळी एकत्रित शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला.
संख्याबळ नसतानाही त्यांनी भाजपचा खासदार निवडून आणला. त्यावेळी खुद्द शरद पवारांनीही फडणवीसांचे कौतुक केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना आपलंसं केलं, अनेक लोकांशी जोडून घेतलं असं पवार म्हणाले होते. त्याच रात्री शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि सूरतमार्गे गुवाहाटीची वाट धरली. त्यानंतर राज्यातली सत्ता बदलली आणि महायुतीचे सरकार सत्तेत आलं.
महायुतीतही संधी हुकली, पण जिद्द सोडली नाही
एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घेतल्यानंतर पूर्ण संख्याबळ असतानाही, संधी असतानाही देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रिपदाची संधी पुन्हा हुकली. त्यावेळी कमी आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद घ्यावं लागलं. अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा संधी असतानाही मुख्यमंत्रिपद हातून निसटलं. ही देवेंद्र फडणवीसांच्या संयमाची पुन्हा एकदा परीक्षा होती.
अजितदादांना सोबत घेतल्यानंतर टीका
एकीकडे एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर शिवसेना पक्ष फोडल्याचा आरोप फडणवीसांवर होत होता. तर त्याचवेळी अजित पवारही फडणवीसांच्या सोबतीला आले. वेगळ्या विचारधारेच्या पक्षाला सोबत घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर मोठी टीका झाली. पण देवेंद्र फडणवीस यांनी भविष्याचा विचार केला आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
विधानसभेला 'करो या मरो' ची लढाई
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा झटका बसला. मिशन 45 प्लस असं ध्येय ठेऊन उतरलेल्या भाजपची धूळदाण उडाली आणि केवळ 17 जागा पदरात पडल्या. त्यातही भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. त्यामुळे फडणवीसांचे नेतृत्व संपले, राजकारण संपलं अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
अजित पवारांना सोबत घेतल्याने ही अवस्था झाली अशी देवेंद्र फडणवीसांवर टीका सुरू झाली. पण देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यावर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. लोकसभेनंतर विधानसभेसाठी 'करो या मरो' अशी स्थिती होती. त्या काळात शांतपणे मायक्रो मॅनेजमेंट केलं आणि विधानसभेला मतांची सुनामी आणली. आपल्याला चाणक्य का म्हणतात याची प्रचितीच देवेंद्र फडणीसांनी दिली.
चलाख फडणवीसांची चाणाक्ष कामगिरी
उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला. त्याचाच फायदा भाजपला निवडणुकीत झाल्याचं दिसून येतंय. भाजपने त्यांच्या इतिहासाताली सर्वाधिक जागा तर जिंकल्याच, पण महायुतीतील इतर पक्षांचे आमदारही निवडून आणले. 'मी पुन्हा येईन' म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता पुन्हा आले आहे आणि तेही एकहाती बहुमत घेऊन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर आता त्यांचे हेच एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा दिसणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड-
संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अखेर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे.