'रेशनिंग कार्ड बनवतो, पण मला 'ते' हवं'
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2016 05:25 AM (IST)
विरार: भाईंदरमध्ये एका रेशनिंग ऑफिसरला अटक करण्यात आली आहे. अजित कासोरे असं या रेशनिंग ऑफिसरचं नाव असून, तो भाईंदर पूर्वेकडील रेशनिंग कार्यालयात कामाला होता. रेशनिंग कार्ड बनवण्यासाठी आलेल्या एका महिलेला फोन करुन शारिरिक संबध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप कासोरेवर आहे. संबंधित महिला २ जूनला रेशन कार्ड मागण्यासाठी कार्यालयात गेली असता, रेशनिंग कार्ड अजून तयार झाले नसल्याचे सांगत, कासोरेने त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने संबंधित महिलेशी संपर्क साधून, सतत फोन करण्यास सुरुवात केली. एके दिवशी कासोरेने फोन करुन मी तुमच्या नवऱ्याचा मित्र बोलत आहे, असं सांगत तिच्याशी शारिरिक संबंधाची मागणी केली. त्या महिलेने फोन कट केल्यावर पुन्हा फोन लावला असता तो फोन बंद करुन ठेवला होता. अखेर या महिलेने नवऱ्याच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. नवघर पोलिसांनी मोबाईल नंबरची चौकशी केली असता तो मोबाईल कासरे याचाच असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अजित कासरेला अटक केली आहे.