Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र दिनादिवशी (1 मे) औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ॲड. अजय टी. कानवडे यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. 


राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरुन सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. तसेच काही संघटनांनी त्यांच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती. अशातच आता रिपब्लिकन युवा मोर्चाचे वतीने राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घालावी अशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे हे त्यासाठी औरंगाबाद खंडपीठात उपस्थित आहेत.


दरम्यान, राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीने इशारा दिला आहे. महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादेत दाखल होणार आहेत. राज ठाकरेंनी पोलिसांनी दिलेल्या अटी न पाळता आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास भर सभेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी रवाना होणार आहेत. पुण्यातून निघाल्यावर राज ठाकरे आधी पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या वढू  या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.  राज ठाकरेंसोबत पुण्यातून मनसे कार्यकर्त्यांच्या सव्वाशे ते दिडशे गाड्यांचा ताफा असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झाले आहे. 3 मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, त्यापुर्वी राज ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुण्यात असणार आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: