Devendra Fadnavis On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. परंतु, या चौकशीवरून आज देशभर काँग्रेसकडून आंदोलने करण्यात आली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटंबाने 2010 साली यंग इंडिया नावाची केवळ पाच लाख रूपयांवर कंपनी सुरू केली. या कंपनीच्या  माध्यमातून गांधी कुटुंबाने दोन हजार कोटी रूपयांची संपत्ती हडप केली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली आहे. परंतु, संपूर्ण देशभरात आंदोलने करून  देशातील जनतेला वेठीस धरण्याचे काम काँग्रेसने केले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर ईडीने राहुल गांधी यांची चौकशी केली. काँग्रेसने याचा बाऊ करण्यापेक्षा चौकशीला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडप करणे गुन्हा आहे. परंतु, हा गुन्हा गांधी कुटुंबाने केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


विधान परिषदेची पाचवी जागा भाजप जिंकणार
दरम्यान, विधान परिषदेची पाचवी जागा भाजप नक्की जिंकेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मी जास्त बोलत नाही, परंतु, मला विश्वास आहे की आमचा पाचवा उमेदवार विजयी होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.    


ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका 
 देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ओबीसी समाज्याच्या राजकीय आरक्षणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी समाज्याच्या राजकीय आरक्षणासाठी सध्या जो सर्व्हे सुरू आहे,  त्या सर्व्हेमध्ये खूप चुका आहेत. या सर्व्हेनुसार ओबीसी समाजाची संख्या घटणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल. ओबीसींच्या संख्येपेक्षा कमी संख्या सर्व्हेमध्ये दाखवली जात आहे, असा आरोप यावेळी दवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


तर आम्ही रस्त्यावर उतरू
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी छगन भुजबळ प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या सर्व्हेमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे. सरकारने त्यावर योग्य कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.