मुंबई : महापौरपदापासून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत प्रवास करणारे देवेंद्र फडणवीसच आगामी निवडणुकांसाठी भाजपचा चेहरा असतील. राज्यातल्या दहा महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा भाजपकडून पुढे केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात शहरी विकासावर लक्ष केंद्रीत करुन शहरांमधल्या विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे. अनेक सभांमधून मुख्यमंत्री केवळ शहरी विकासावर भर देत असून प्रचारातल्या पुढच्या काळात ते अजून सक्रीय होण्याची शक्यता आहे.

मुंबईसारख्या शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरकडे फडणवीसांचं बारकाईने लक्ष आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून किती निधी देणार, कोणते प्रकल्प राबवणार हेच मुख्यमंत्री आपल्या सभांमधून मांडत आहेत

स्वच्छ प्रतिमा आणि तरुण असल्यामुळे तरुणवर्गाला आकर्षित करणारा फडणवीसांचा चेहरा आहे. देशात दुसऱ्यांदा सगळ्यात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला होता. तसंच वयाच्या 27 व्या वर्षीच नागपूर महापालिकेतील सगळ्यात तरुण महापौर म्हणून त्यांनी नेतृत्व केलं.