मुंबई : युती झाली तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावरच होईल, अन्यथा होणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला इशारा दिला होता. ही पारदर्शकता म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. मुंबईतील विलेपार्लेमध्ये झालेल्या मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदुत्व हा जसा धागा आहे, तसा पारदर्शकता हा अजेंडा असला पाहिजे. पक्ष चालतात, पैसे जमा करतात, मात्र तुम्हाला पारदर्शकता आणावी लागेल, महापालिका पैसे जमा करायचं साधन केलं तर पारदर्शकता आणता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलं.
शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आमचे आक्षेप होते, तसे त्यांचेही भाजपवर काही आक्षेप होते. मात्र ते बाजुला ठेवून परिस्थितीनुसार आम्ही एकत्र येतो. कोणत्याही पक्षाला वाटेल आपलं एकट्याचं सरकार असलं पाहिजे, पण जनतेचा कौल असतो त्यानुसार एकत्र येतो, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
महापालिका दुभती गाय नाही
मी पक्षाध्यक्ष झाल्यावर सांगितलं पक्ष चालवायला कोणाची मदत नको. लोक मात्र पैसे देत असतात. महापालिकेचा वापर दुभती गाय म्हणून, पक्ष चालवण्याचं साधन म्हणून करु नये. तस केलं तर अधिकारी, कंत्राटदारांच्या समोर कोणत्या ताकदीने उभं राहणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
मेट्रो 3 ला शिवसेनेने विरोध केला, आम्ही सांगितलं चर्चा करा, गिरगाव हा प्रश्न होता, त्यावर गिरगावातून मराठी माणूस बाहेर जाणार नाही, असं आश्वासन आम्ही दिलं. गिरगाववासियांना तिथेच 400 चौरस फूट जागा देण्यात येईल, असं फडणवीसांनी सांगितलं.
अँकरला तिळगुळ देणार
टीव्हीवरच्या प्रत्येक अँकरला मकरसंक्रांतीला तिळगुळ देणार, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. गोड बोलण्यासाठी पूर्वीच्या काळी माध्यमं कमी होती. आज जास्त मीडिया आला आहे. त्यामुळे तुमच्यात स्पर्धा असते, आपण काय बोललो आणि त्याचा अर्थ काय काढला, याची आम्हीपण मजा घेतो, असं मुख्यमंत्री उपरोधाने म्हणाले. मी दररोज टीव्ही पाहत नाही, तुम्हाला 24 तास बातम्या चालवायच्या म्हणून आम्हीपण काळजी घेतो, असं फडणवीस मिष्किलपणे म्हणाले.
राम मंदिरवरुन श्रेयवाद
मुंबईत पश्चिम रेल्वेवरील स्थानकाला राम मंदिर हे नाव शासनानं दिलं आहे. कार्यक्रम झाला, तरी हौशे, नवशे, गवशे श्रेयवादाची लढाई लढतात, नेत्यांनी त्यावेळी दुर्लक्ष करायचं असतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना टोमणा लगावला.
नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांसाठी व्यवस्था
शेतमालाला भाव हा विषय नोटाबंदीनंतर आलेला नाही. शेतकऱ्यांना खत, बियाणं खरेदीसाठी पैसे लागतो, त्यामुळे त्याची व्यवस्था केली. शेतमाल अडला असता तर व्यवस्था कोलमडली असती. पण शेतमाल विकला गेला. कॅशने पैसे देत होते म्हणून हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती.
आता शेतकऱ्याने तक्रार केली की हमी भावापेक्षा कमी भाव दिला तर व्यापारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीनंतर त्रास झाला असला, तरी त्यातूनही शेतकरी बाहेर पडल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या निराशेमुळे होत आहेत. ही निराशा दूर करायला हवी. आधी यवतमाळला जास्त आत्महत्या होत होत्या. बळीराजा चेतना अभियान केल्यामुळे 40 टक्के आत्महत्या कमी झाल्या.
आत्महत्या किती झाल्या, त्याची तुलना नको. एका वर्षात चित्र कदाचित बदलणारही नाही, मात्र प्रयत्न केला तर नक्की बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आचारसंहिता लागू असताना मुंबईत मराठा मोर्चा आयोजकांच्या मागण्यांना सरकार सकारात्मक उत्तर देऊ शकणार नाही. आमचा यात हस्तक्षेप नाही. सरकार भूमिका स्पष्ट करुन सकारात्मक प्रतिसाद देणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.