सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. आपल्या मित्राच्या घरचे वीज कनेक्शन का कापण्यात आले याचा जाब विचारत काळे महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. काल संध्याकाळी 8 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. आरोपी राजेश काळे यांच्यासह अन्य दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या सर्व आरोपींना न्यायलयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


सोलापुरातील राजेंद्र नगर येथील रहिवासी असलेले महेश शिवण्णा म्हेत्रे यांची विजबील थकीत होते. त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत कऱण्यात आलेला होता. मात्र आरोपी राजेश काळे यांनी महावितरणच्या नेहरु नगर येथील कार्य़ालयात जाऊन कर्मचाऱ्याला या बाबत जाब विचारला. तसेच आपण सोलापूरचे उपमहापौर आहोत त्यामुळे पुन्हा एकदा वीज जोडणी करुन देण्याबाबत दबाव टाकला. फिर्यादी अजीम सय्यद यांनी याबाबत असमर्थता दाखवल्यानंतर आरोपी राजेश काळे आणि त्यांच्या इतर साथीदार मित्रांनी फिर्य़ादी अजीम सय्यद यांना चापट मारुन दमदाटी केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपी राजेश काळे यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर उर्वरित तीन आरोपींचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. 




उपमहापौर राजेश काळे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे चर्चेत असतात. 30 डिसेंबर रोजी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरुन अश्लील शिवीगाळ तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र गुन्हा दाखल होताच काळे फरार झाले होते. त्यानंतर काळे यांना स्वपक्षीय नगरसेवकांनी घरचा आहेर देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. जवळपास 5 ते 6 दिवस फरार असलेले राजेश काळे यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. 


भाजपमधून नगरसेवक म्हणून निवडणून आलेल्या राजेश काळे यांच्यावर 14 जानेवारी रोजी पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली. याआधी देखील राजेश काळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे काळे यांच्याविरोधात पोलिस कठोर कारवाई करणार असल्याची शक्यता सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर शहरात राजेश काळे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याविरोधात तडीपार कऱण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी व्यक्त केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :