Pune Airport : "पुण्यातील विमानतळ बारातमतीला नेहणार असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. परंतु, पुण्यातील विमानतळ बारामतीला नेहलं जाणार नाही. त्यामुळं उगाच सारखं बारामती, बारामती असं ओरडू नका, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी पुण्यातील विमानतळ कोणत्याही परिस्थित बारामतीला हलवणार नसल्याचे स्पष्ट केले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार आज चाकण एमआयडीसी हद्दीत एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं होणार होतं. मात्र, आता ते विमानतळ बारामतीत होणार आहे. ते विमानतळ इथं झालं असतं तर आणखी पंचतारांकित हॉटेल इथं उभारली गेली असती. पण काही कारणास्तव विमानतळ बारामतीच्या हद्दीत जातंय. पण आता आमच्या हद्दीत किमान डोमेस्टिक विमानतळ उभारावे. अशी मागणी मी अजित पवार यांच्याकडे केलीय असे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यावेळी म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील विमानतळ पुण्यातच होणार असल्याचे सांगितले.  


"विमानतळाच्या जागेसाठी सर्व्हे महत्वाचा असतो. सर्व्हेनंतरच विमानतळाची जागा निश्चित केली जाते. झालेलं विमानतळ चोवीस तास सुरू रहायला हवं, त्याअनुषंगाने जागा निश्चित केली जाते. मुंबईनंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं. अशा ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतात. यासाठी येणारे उद्योगपती स्वतःचे विमान घेऊन येतात. त्यांना लगेच परतावे लागते. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे गरजेचे आहे. मुंबईतील विमानतळाचा भार कमी करण्यासाठीचं नियोजन सुरु आहे. पुण्यातील विमानतळ कुठं व्हावं याची पाहणी केंद्रीय हवाई मंत्रालय करत आहे. मुख्यमंत्री देखील यावर लक्ष देऊन आहेत. या सर्वांकडे माझी मागणी आहे की आता या विमानतळाचे काम तातडीनं सुरू करावे, जास्तीची दिरंगाई आता टाळावी, असे  अजित पवार म्हणाले. 


मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन होणार


मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन होणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. अजित पवार म्हणाले,  "मुंबई ते हैदराबाद अशी एक बुलेट ट्रेन होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, मावळ, थोडी खेड, हडपसर, पुरंदर, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर ते हैदराबाद अशी बुलेट ट्रेनची आखणी केंद्र सरकार करत आहे. यात खूप कमी थांबे असणार आहेत. दळणवळणच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था उभी करण्याची आमची तयारी आहे." 
 
एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी काल औरंगाबादमधील खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "काही गोष्टींना फार महत्व देऊ नका. तुम्ही काहीतरी विचारायचं मग आम्ही तरी बोलायचं, हे ताबडतोब थांबवा. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. या महाराष्ट्रात छत्रपतींचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वागलं पाहिजे."


दरम्यान, पुण्यातील बालगंधर्व नाट्य मंदिराबाबतही अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. "नाट्यमंदिर विकसित करण्याचा हा निर्णय महापालिकेत सत्तेत असताना भाजपने घेतला आहे. मी बातम्यांमध्येच हे वाचलं. मला याबाबत जास्त काही माहिती नाही, मला फक्त प्रेझेंटेशन दिलं गेलं. महत्वाच्या कलाकारांच्या कमिटीसमोरच झालेला हा निर्णय आहे. त्यातच त्यांनी तीन ऑडिटोरियम करायचे ठरले आहे. त्यामध्ये पार्किंग देखील असेल. त्यामुळे कोणताही नवा निर्णय घ्यायचा म्हटलं की त्याला दोन बाजू असतात. आम्ही राज्यकर्ते बहुमताचा आदर करूनच निर्णय घेतो, असे अजित पवार यावेळी म्हणाले.