रत्नागिरी : नोटाबंदीचे परिणाम राज्यातील विविध पर्यटनस्थळांना जाणवत आहेत. कोकणातील विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरही त्याचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे किनार ट्टीतील व्यवसायिक सांगत आहेत.

आता नुकताच पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. पण जितके पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर येणे अपेक्षित होते किंवा दरवर्षी या कालावधीत येतात, त्याच्या पन्नास टक्केच पर्यटक यंदा आले असल्याचे येथील व्यवसायिक सांगतात.

समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारल्यावर आलेल्या पर्यटकाना नेमकी नोटाबंदी झळ कशी बसली, त्याची व्यथा ते मांडतात. सुरुवात पेट्रोलपंपावरून होते. कारण इथे आता पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. पहिला संघर्ष इथेच सुरु  होतो.

हॉटेलमध्ये तर सर्वाधिक अडचणींना सामोरं जावं लागतं. चार ते पाच माणसे असतील तर चहा नाश्ताचं बिल जास्तीत जास्त तीनशे चारशे होतं. अशा वेळी नोट दोन हजाराची असेल तर संघर्ष अटळ असतो. महामार्गावरील अनेक होटल व्यवसायिक आता बिल न देता जा येताना पुन्हा जेवायला या. दोन्ही वेळचं बिल एकदम द्या, पण सुट्टे मागू नका असच ग्राहकाला सांगतात.

ग्रामीण भागात अजून कार्ड पेमेंटची पद्धत रुजली नसल्याने कार्डच्या भरवशावर आलेल्या पर्यटकांना अडचणींना सामोरे जाव लागतं आहे. किनाऱ्यावर छोटे छोटे व्यवसाय करणारे तर खूप अडचणीत आले आहेत. प्रती माणशी जिथे तीस आणि विसच रुपये घ्यायचे आहेत. त्यांना सुट्टे आणायचे कुठून हा प्रश्न पडतो आहे. यामुळे अनेक वेळा समोर आलेला धंदा सोडावा लागतो आहे. या साऱ्या अडचणींनी लोक त्रस्त आहेत. पण तरीही आम्ही काही दिवसांसाठी हा त्रास देशासाठी सहन करु अशी पुष्टीही जोडत आहेत. तर काही पर्यटक निघतानाच संपूर्ण नियोजन करून निघाले आहेत. पण या नोटाबंदीचा फटका कोकणातील सगळ्याच किनाऱ्यांवर जाणवतो आहे हे नक्की.