बुलडाणा : महाराष्ट्रातील शाळा खाजगी कंपन्यांना चालवण्यासाठी दिल्या जात आहेत. आता सरकारही खाजगी कंपन्यांकडे द्या, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. ''भाजपने शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे, महाराष्ट्राच्या जनतेने यांच्याकडे यासाठी सत्ता दिली नव्हती'', असं ते म्हणाले.


जिजाऊ जन्मत्सोवाच्या निमित्ताने सिंदखेड राजात अवघा महाराष्ट्र लोटल्याचं चित्रं आहे. लाखो शिवप्रेमींप्रमाणेच आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जिजाऊंना वंदन केलं. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाजप सरकारला घेरलं.

''महाराष्ट्रातल्या हजारो शाळा बंद होत आहेत. ज्या पक्षाकडून शाळा चालवल्या जाऊ शकत नाही, ते सरकार काय चालवणार. यांना शाळा चालवता येत नाही, मलाई खाता येते'', असं म्हणत केजरीवाल यांनी शाळांच्या खाजगीकरणावर जोरदार टीका केली.

''तीन वर्षात दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये क्रांती झाली आहे. एकही शाळा बंद केली नाही, नव्या शाळा सुरु केल्या. दिल्लीतल्या सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बनत आहेत. हे सगळं दिल्लीत होऊ शकतं, तर महाराष्ट्रात का नाही?'' असा सवालही केजरीवाल यांनी केला.

''दिल्लीतल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व उपचार मोफत होतात, महाराष्ट्रात भरमसाट पैसा मोजावा लागतो'', असंही केजरीवाल म्हणाले.

''दिल्लीचा मुख्यमंत्री झालो तेव्हा देशात सर्वात महाग वीज दिल्लीत मिळत होती, मात्र आज तीन वर्षांनंतर सर्वात स्वस्त वीज दिल्लीत मिळत आहे'', असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

VIDEO : बुलडाणा: अरविंद केजरीवाल यांचं सिंदखेडराजा येथील भाषण