नागपूर : नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. कारण गेल्या 11 दिवसात 9 हत्येच्या घटना घडल्या आहेत.आज सकाळी नागपूरच्या शिवानी कॉलनीमधील शिव मंदिर परिसरात 28 वर्षीय अमोल भेंडारकर या तरुणाची हत्या करण्यात आली.


याच परिसरातील कुख्यात गुंड संदेश पाटील उर्फ लवंगनं अमोल बेंचवर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दग़ड घालून हत्या केली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. मात्र अमोलच्या मित्रांनी हा संशय फेटाळला आहे.

हत्यांचा घटनाक्रम

पहिली हत्या : 26 एप्रिल 2018 - नंदनवन परिसरातील पँथरनगर मध्ये तडीपार गुंड राहुल पावस्करची भोसकून हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधांच्या संशयातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी राहुलची हत्या केली होती. (आरोपीला अटक)

दुसरी हत्या : 27 एप्रिल 2018 - अजनी परिसरातील रामटेके नगरात अविनाश माहुर्लेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. (आरोपीला अटक)

तिसरी हत्या : 30 एप्रिल 2018 - नंदनवन परिसरात गुरुदेवनगरमधील पंचशील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 13 लाखांची लूट करत दरोडेखोरांनी नूर खान या सुरक्षा रक्षकाची हत्या केली. लुटारुंना पेट्रोल पंपावर साठवलेली रक्कम लुटायची होती. त्यात अडसर ठरलेल्या नूर खानची हत्या करत ती लूट करण्यात आली. हे घटनास्थळ दाट लोक वस्तीत अत्यंत वर्दळीच्या भागात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं (आरोपीला अटक)

चौथी हत्या : 1 मे 2018 - गोधनी परिसरात गजानन नगरात महिमा विटोले या 20 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून रस्त्यावर गळा चिरुन हत्या करण्यात आली. आरोपी महिमाला तिच्यासोबत राहण्याचे सतत आग्रह करायचा. पण महिमा त्याला टाळत होती. (आरोपीने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती)

पाचवी हत्या : 3 मे 2018 - रामनगरमध्ये कर्नाटक संघासमोर रज्जू यादव या 33 वर्षीय इसमाची फेरीवाला आणि त्याच्या सहकाऱ्याने पैशाच्या वादातून डोक्यावर सत्तूरने वार करत भरदिवसा हत्या. (दोन्ही आरोपींना अटक)

सहावी हत्या : 7 मे 2018 - एमआयडीसी परिसरातील आयसी चौकात श्रीकांत गुहे या 22 वर्षीय गुन्हेगाराची टोळी युद्धातून हत्या. मृत एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता. विरोधी टोळीने जुन्या गुन्ह्याचा सूड घेण्यासाठी हत्या केली.

सातवी हत्या : 5 मे 2018 - गोंडखैरी गावात जिल्हा परिषद शाळेत नंदू भोसले या 22 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकरीकडून तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय.

आठवी हत्या : 5 मे 2018 - भांडेवाडी परिसरात राजेश खडसे या कुख्यात गुन्हेगाराची त्याच्या राहत्या घरात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नववी हत्या : 6 मे 2018 – दुबे नगर परिसरात शिवाजी कॉलनीमध्ये शिव मंदिरात अमोल भेंडारकर या 28 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या, परिसरातील कुख्यात गुन्हेगार लवंग पाटीलने ही हत्या केल्याचं उघड