गोंदिया : पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर तोडगा काढण्यासाठी गोंदियातल्या एका शिक्षकाने अनोखी सायकल तयार केली आहे. फक्त 5 रुपयात 30 किमीचा प्रवास करणारी ही बॅटरीवरील सायकल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


सायकल म्हणजे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहन. गोंदियातील डांगोर्ली गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे.

मेश्राम गुरुजींनी फक्त 13 हजार रुपयात पर्यावरणाचा ऱ्हास टाळणाऱ्या या सायकलची निर्मिती केली आहे. सायकलवर 12 व्हॅटच्या दोन बॅटऱ्या बसवल्या आहेत. ही सायकल 10 हजारात उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे स्वतःची दुचाकी-चारचाकी असूनही मेश्राम गुरुजी आपल्या निलज गावातून डांगोर्लीच्या शाळेपर्यंतचा प्रवास या सायकलवरुनच करतात.

मेश्राम गुरुजींच्या सायकलीचा आदर्श ग्रामस्थांनीही घेतला आहे. आता पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांऐवजी अशा पर्यावरणपूरक वाहनांनी प्रवास केला तर सर्वात आधी आपल्या खिशातल्या पैशाची बचत होईल आणि प्रदूषणातूनही मुक्तता होईल.