सिंधुदुर्ग : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर शिवसेनेचेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घणाघाती आरोप केले आहेत. दीपक केसरकर हे जादूगार आहेत. करणी करुन त्यांनी नारायण राणेंचा पक्ष प्रवेश अडकवला आहे. त्यांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं, असा आरोप बबन साळगावकर यांनी केला. शिवसेनेतूनच झालेल्या या आरोपाने सावंतवाडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ माजली आहे.
'यापुढे बबन साळगावकर माझे राजकीय वारसदार नसतील'
मात्र दीपक केसरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. साळगावकर यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्न पडत असल्याने हे आरोप करत असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. आतापर्यंत मी बबन साळगावकर यांना माझा राजकीय वारस म्हणत होतो. मात्र अशा आरोपांमुळे यापुढे माझे ते राजकीय वारसदार नसतील, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं. तसंच बबन साळगावकर यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे, त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही, असंही केसरकर यांनी सांगितलं.
कामांच्या गमछ्या मारु का? : दीपक केसरकर
"भाजपसोबत शिवसेनेची युती आहे. गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राडा झाला नाही. ही जादू मी केली. ही जादू असेल ती मी पाच वर्षात जादू करुन दाखवली. केलेल्या कामांच्या गमछ्या मारत बसू का," असा टोला दीपक केसरकर यांनी बबन साळगावकर यांना लगावला.
....तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश नाही
शिवसेनेचा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ठाम विरोध आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश होणार नाही, अशा शब्दात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ठणकावलं. ते सिंधुदुर्गात बोलत होते. नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबद्दल स्वत:च तारीख जाहीर केली आहे. शिवसेनेला विचारात घेऊनच राणेंना प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दीपक केसरकरांनी अनेकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं, शिवसेना नगराध्यक्षांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2019 01:11 PM (IST)
गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राडा झाला नाही. ही जादू मी केली. ही जादू असेल ती मी पाच वर्षात जादू करुन दाखवली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -