PM Modi Uddhav Thackeray :  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत (Shiv Sena MLA Disqualification Case) सध्या शिंदे गटाच्या  आमदारांची सुनावणी सुरू आहे. सोमवारी (दि. 11 डिसेंबर) राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची उलट तपासणी ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी घेतली. कामत यांच्या उलट तपासणीच्या दरम्यान दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत हातमिळवणी करणार होते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर त्यांनी 15 दिवसांचा वेळही मागितला होता. मात्र, अधिक वेळ मागण्यासाठी त्यांनी माझ्याद्वारे पंतप्रधान मोदी यांना निरोप पाठवण्याची व्यवस्था केली असल्याचा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. 
 
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा युती करण्याबाबतच्या घडामोडीची सविस्तर माहिती आज दीपक केसरकर यांनी दिली. याआधी देखील शिंदे गटाच्या आमदारांनी आपल्या उलटतपासणीत शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे येणार असल्याचे अथवा भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याची साक्ष दिली होती. मात्र, आज दीपक केसरकर यांनी आपल्या उलट तपासणीत महत्त्वाची साक्ष नोंदवताना घटनाक्रम सांगितला आहे. 


पंतप्रधान मोदी आणि उद्धव यांच्या भेटीसाठी मध्यस्थी


ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी तुम्ही किंवा तुम्ही ज्यांना नेते म्हणता त्यांनी याआधी कधीही हिंदुत्व विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली नाही. हे खरे आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी म्हटले की, हे खरे नाही. मी वारंवार उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत जाण्याची विनंती केली होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी भाजपची विचारसरणी मिळतीजुळती आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची बैठक घेण्यासाठी मध्यस्थी केली होती असा दावाही केसरकर यांनी केला. 


पंतप्रधान मोदींपर्यंत उद्धव यांचा निरोप पोहचवला


केसरकर यांनी म्हटले की, 8 जून 2021 रोजी ज्यावेळी मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर होते. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर फक्त उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या बैठकीत काय झाले? याची माहिती मला उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले होते, अशी माहिती मला मिळाली. मुंबईत पोहचल्यानंतर 15 दिवसांच्या आत महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून युतीची पुर्नस्थापना करण्याचा शब्द नरेंद्र मोदींना दिला होता. परंतु मला माझ्या सहकाऱ्यांची समजूत घालण्यासाठी अधिकचा वेळ लागेल, असा निरोप मी मोदीजी यांना द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते. हा निरोप मी दिल्लीला पोहचवण्यासाठी व्यवस्था केली. दोन्ही पक्षांनी एकत्र यावे ही पक्षातील बहुतेक लोकांची इच्छा होती. त्यामुळे सदर बाबीस वेळ होत असल्याने मी माझ्या पक्षातील काही ज्येष्ठ लोकांना याची माहिती दिली. त्यामध्ये सुभाष देसाई, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांना माहिती दिली आणि त्यांना याबाबतचा निर्णय लवकर होण्याबाबत उद्धवजींना विनंती करावी, अशी विनंती केली असल्याचा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.