Agriculture News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं तत्काळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे. याबाबत जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई देण्याची मागणीही जलील यांनी केली आहे.


जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...


खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून म्हटलं आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळं नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात शेतकरी बांधवांचे खरिप हंगामाचे उभे पिक वाहून गेल्याने आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचं जलील म्हणाले.


ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत जाहीर करा....


नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असून कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असुन कधी न भरून निघणारे आर्थिक नुकसान झालेले आहे. पावसान जमिनीत मोठ्या प्रमाणात तण उगवल्यामुळे रब्बीच्या पेरणीला विलंब होणार आहे, खरिपाचे उत्पन्न अद्याप हाती आलेले नाही. त्यामुळे तण काढणे, पेरणीसाठी बियाणे व खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकरत मिळण्यास मदत होईल. म्हणून आपणास नम्र विनंती की, शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत जाहीर करावी, असे जलील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Raj Thackerays Letter to Maharashtra CM : ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्या; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र