Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


अनिल देशमुखांच्या जामीनावर आज सुनावणी 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय केसमधील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. आज दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. अनिल देशमुख सध्या जसलोक रूग्णालयात दाखल आहेत. 


आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकत्र


आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त हे तिन्ही महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उदघाटन होणार आहे. गेल्या वर्षी या दीपोत्सवावरुन सेना आणि मनसेत वाद झाला होता.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर असून दुपारपर्यंत शहरातील विविध कार्यक्रमात ते हजेरी लावणार आहेत. यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शिंदे गटाच्या नाशिकच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान नाशिकमध्ये पहिले वहिले शिंदे गटाचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले असून त्याच्या उदघाटनासाठीचा महत्वाचा कार्यक्रम समजला जात आहे. शिंदे गटाच्या आगामी पायाभरणी साठी हे महत्वाचे केंद्र असणार आहे. काही दिवसांनी नाशिक महापालिका निवडणुका रंगणार आहे. त्यादृष्टीने देखील तयारीचा श्रीगणेशा हे कार्यालय ठरण्याची शक्यता आहे. तर अलीकडेच अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. यांचा प्रवेश सोहळा या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासह इतर कोणते पदाधिकारी शिंदे गटाची वाट चोखळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


सिंधुदुर्गात भाजपकडून संविधान रॅली


शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र त्यांनी चौकशीला सामोरे न जाता कार्यालयावर मोर्चा काढत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. त्यासाठी भाजपकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजप कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनाला  


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणार आहेत. केदारनाथला मोदी सकाळी 8.30 वाजता पोहचतील आणि पूजा करतील. त्यानंतर मोदींच्या हस्ते रोपवे योजनेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी बद्रीनाथाला जाऊन पूजा करतील. बद्रीनाथलाही रोपवे आणि विविध योजनांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.


आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस


आज वसुबारस म्हणजेच दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि दिवाळीचा शुभ पर्वाची सुरुवात केली जाते.