Pune News : दिवाळीच्या काळात पुण्यातील अनेत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. पुढील 10 दिवस पुणेकरांकडून (Pune) कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) केली आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस पुणेकरांची दंडापासून सुटका होणार आहे.
मागील काही दिवस झाले पुण्यात दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. मध्यवर्ती परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळत होत्या. त्यामुळे अनेक पुणेकर वाहतुकीचे नियम तोडून मार्ग काढत होते. पोलिसांनाही या गर्दीवर नियंत्रण ठेवणं आणि कारवाई करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे 10 दिवस कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
'आधी रस्ते नीट करा'
पुण्यात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली. त्यामुळे पुणे शहरात प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनाची गती कमी होत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वेगळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुरुवातील शहरातील रस्ते नीट करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी शहरातील 400 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकार आल्यानंतरच्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ते येत्या काळात चांगले होऊन वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
1 नोव्हेंबर पासून नवीन विकास आराखडा
1 हजार 58 कोटी रुपयांच्या मागील सरकारच्या कामांना या सरकारने परवानगी दिली होती. स्थगिती उठवताना सरसकट न उठवता त्याची पडताळून पहायचं ठरवलं. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं हे ठरवण्यास सांगण्यात आलं आहे.त्यानंतर पुढचे काही दिवस प्रत्येक खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नवीन विकास आराखडा तयार करण्यात येईल. 1 नोव्हेंबर पासून नवीन विकास आराखडा राबवण्यास सुरुवात होईल. जिल्हा नियोजन समित्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत, या संदर्भात बैठकीत चर्चा झाली.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अॅक्शन प्लान तयार
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त मिळून अॅक्शन प्लान तयार करतील. रस्त्यावर चलान फाडण्यात वेळ घालवू नये त्यासाठी शहरात नवीन नाले बांधण्याची गरज आहे. मोठे नाले बांधण्यासाठी काम करा, अशा सूचना या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी केल्या.
पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेण्याचा निर्णय योग्य: चंद्रकांत पाटील
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली. हा निर्णय योग्य आहे. लोक काय म्हणतात, याचा फार विचार करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. माघार घेतली नसती तरीदेखील टीका केली असती आता घेतली तरीही काहीतरी बोलतीलच, असंही ते म्हणाले.