मुंबई: खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.


नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना खड्ड्यांचा फटका बसला. आदित्य ठाकरे नाशिककडे जात असताना, खड्ड्यांमुळे त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर घोटीजवळ फुटले. मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात शुक्रवारी ही घटना घडली.

ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर माझाच्या ट्विटला कोट करुन, चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेवर निशाणा साधला.


खड्ड्यांसाठी नवी डेडलाईन

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्यांवरुन आता नवी डेडलाईन दिली आहे. डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजवले जातील असा दावा त्यांनी केला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली.  त्यासाठी 2017 च्या अर्थसंकल्पातील मंजूर कामं तातडीनं सुरू करावीत असे आदेशही त्यांनी दिलेत. शिवाय कंत्राटदारांना वेळमर्यादा आखून खड्डेभरणीची कामं पूर्ण करण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.

हायब्रीड अँन्युइटी प्रणाली अंतर्गत मंजूर कामे नियमाधीन राहूनच करावित, त्यात अनियमितता आढळल्यास संबंधित व्यक्तींची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. हायब्रीड अँन्युइटी प्रणालीअंतर्गत राज्यातील मंजूर रस्ते मे २०१९ पर्यंत तीन पदरी होतील. त्यामुळे राज्यातील रस्ते वाहतुकीसाठी सुयोग्य होतील. असं पाटील यांनी म्हटलं आहे.




दरम्यान, यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प्रत्येक वर्षी खड्डे भरण्यासाठी डिसेंबर अखेरची डेडलाईन दिली होती. 2016 मध्ये 15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा हजार रुपये मिळवा मोहीम त्यांनी सुरु केली होती.

संबंधित बातम्या  

खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हरचा टायर फुटला