चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या लोहारा-जुनोना जंगलात मृत झालेल्या गायींना जंगलात अक्षरशः फेकून देत विल्हेवाट लावली आहे. या भागात वन्यजीवांनी या मृत गायींवर ताव मारायला सुरुवात केली आहे. याच भागात असलेल्या एका गोरक्षण संस्थेने मेलेल्या गायींची अशी विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले असून गायींना असलेले रोग वन्यजीवात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यासोबतच वाघांवर विषप्रयोग करण्यासाठी गायींचा वापर होण्याचा धोका असल्याने वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.


चंद्रपूर शहराजवळ लोहारा या गावी उज्ज्वल गोरक्षण संस्थेची एक गोशाळा आहे. लोकांच्या अनुदानावर ही संस्था गोशाळेतील जनावरांचा सांभाळ करते. देशात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यावर चंद्रपूरसारख्या सीमावर्ती जिल्ह्यात मोठ्या संख्येत जनावरे तस्करीची प्रकरणे उजेडात येत आहेत. ही सर्व जनावरे लोहारा येथील संस्थेत पोचविली जातात.
नुकतीच राजुरा भागात सुमारे 200 गुरांची तस्करी पोलिसांनी पकडली यातील 50 हुन अधिक जनावरे मृत आढळली. या मृत गायी संस्थेने जुनोना जंगलातील तलाव भागात फेकून विल्हेवाट लावल्याचे बोलले जात आहे. लोहारा जंगलात या गायी टाकून दिल्याने परिसरातील ग्रामस्थ प्रचंड दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. त्यांनीही या प्रकाराबाबत वनविभागाला तक्रारी केल्या. विशेष म्हणजे हा भाग सध्या 'वाघडोह मेल' या नावाने परिचित असलेल्या ताडोबा परिघातील सर्वात मोठ्या वाघांचे वास्तव्य स्थान आहे.



काही हौशी वन्यजीव प्रेमी या भागात रात्री फिरत असतांना त्यांना वाघ या गायींवर ताव मारताना दिसला. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर वन्यजीव अभ्यासकांनी या स्थळाची पाहणी केल्यावर त्यांना धक्काच बसला. गोरक्षण संस्थेने सुमारे डझनभर मृत गायी या जागी फेकून विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. संस्थेचा हा बेजबाबदारपणा असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.

या कृत्यामुळे गायींना असलेले रोग जंगलात पसरण्याची भीती असून वाघांवर विषप्रयोग करण्यासाठी गायींचा उपयोग होण्याचा धोका असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. याआधी देखील गोरक्षण संस्थेने असे प्रकार केले होते. विशेष म्हणजे वनविभागाचे या साऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष असून या जंगलात वनविभागाची साधी गस्त देखील नाही. फेकून दिलेल्या मृत गाईंच्या बाजूने गोंदियाला जाणारी रेल्वेलाईन आहे.

याच भागात काही दिवसांपूर्वी  वाघांचे 3 बछडे रुळावर कटून मृत झाले होते. हे जंगल ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या वनविकास महामंडळाने गोरक्षण संस्थेला याआधी नोटीस देखील दिली होती. मात्र कारवाई न झाल्याने पुन्हा अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याची पुनरावृत्ती झाली आहे.