Devendra Fadnavis on Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून एक केलेला काम दाखवावं. मुंबईतील महानगरपालिका जवळ जवळ पंचवीस वर्षे त्यांच्याकडे होती. या दरम्यान त्यांनी केलेलं एक काम दाखवावं. अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळता केलेले काम दाखवावं. हल्ली त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही काम शिल्लक राहिलेले नाही, त्यांना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय दुसरं काहीही जमत नसल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.


उद्धव ठाकरे यांचे भाषण बघितले तर लक्षात येतं, त्यांची सगळी भाषणं ठरलेली आहेत. उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असा टोलाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बोलतांना लगावला आहे. आज देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह बघायला मिळत आहे. अशातच नागपुरातील (Nagpur) गवळीपुरा, टेकडी परिसरातील हनुमान मंदिरात जाऊन आज देवेंद्र फडणवीसांनी मारोतीरायांचे दर्शन घेतले, यावेळी ते बोलत होते.  


विरोधी पक्षातील सारेच्या सारे निराश लोक


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) नुकत्याच झालेल्या एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतीनची उपमा देत निशाणा साधला आहे. याविषयी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या विरोधी पक्षातील सारेच्या सारे निराश लोक आहेत. तसेच याच नैराश्यातून त्यांना आता शिवीगाळ करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी ज्या ज्या वेळी अशा प्रकारची टीका मोदीजींवर करण्यात येते, त्यावेळेस पंतप्रधान मोदींचा मोठा विजय ठरलेला असतो. जेव्हा जेव्हा मोदीजींना विरोधकांकडून शिवा पडतात तेव्हा तेव्हा लोक त्यांचा जय जयकार करत असतात. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. 


विरोधकांकरता सद्बुद्धि दे- देवेंद्र फडणवीस 


नागपूर नगरीतील प्रसिद्ध अशा गवळीपुरा टेकडी परिसरातील हनुमान मंदिराचे आज मी दर्शन घेतलं. यावेळी मारोतीरायांना मी आशीर्वाद मागितले. हनुमान ज्या प्रमाणे शक्ति देतात तसेच ते बुद्धीही देतात. देशातील संकटांवर मात करण्यासाठी आज मी शक्ती मागितली आहे. तर देशाच्या विकासासाठी बुद्धीही मागितलीय. तसेच आमच्या काही विरोधकांकरता सद्बुद्धि दे, असेही मागणं मागितली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या