Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेतील (Shivsena)  फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे (Dasara Melava)  राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना अभूतपूर्व आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी ठाकरेंना समांतर मेळावा भरवून मोठं आव्हान दिलं आहे. त्यामुळे यावेळचा त्यांचा मेळावाही ऐतिहासिक ठरणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. यातील खास बाब म्हणजे व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे.


शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंद यांनी हे बाळसाहेबांच्या विचाराचे सरकार असल्याचे सांगितले होते. आज देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवत आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आपल्या भाषणात हे बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि दिघे साहेबांची शिकवणीनुसार चालणारे सरकार असल्याचं सांगतात. खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवण्यासाठी शिंदे गटाने हा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. 


तर दुसरीकडे नेस्कोप्रमाणे शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला नसल्याने राऊत तुरुंगातच आहेत. शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी ठाम असल्याचा संदेश यामागे देण्यात आला आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी आम्ही ही खुर्ची रिकामी ठेवली आहे, असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या कडव्या आव्हानासमोर यावर्षी शिवाजी पार्कवरचा मेळावा ऐतिहासिक करण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टीकेचे कोणते बाण सोडणार आणि शिवसेनेला कोणती नवी दिशा दाखवणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


बीकेसी मैदानात शिंदे समर्थक कार्यकर्ते सकाळपासूनच दाखल होऊ लागले आहेत. बीकेसी मैदानातला मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी शिंदेंनी कोणतीही कसर ठेवलेली नाही. मेळावा ग्रँड करण्यासाठी गेले अनेक दिवस शिंदे समर्थक जोरदार तयारी करत आहेत. 


संबधित बातम्या :


Maharashtra Politics Shivsena: महाराष्ट्राला मोडून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? शिवसेनेचा शिंदे-भाजपला सवाल


Dasara Melava 2022 : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा आज दसरा मेळावा; दोन्ही बाजूंनी तोफा धडाडणार, संपूर्ण राज्याचं लक्ष!