सातारा : समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मगावी त्यांच्या अर्धपुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड करत पुतळ्याची विटंबना केली आहे. या तोडफोडीमुळे आगरकर विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये  संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंबू हे आगरकर यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन 1989 साली सुरु झालेल्या शाळेबाहेर आगरकरांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. या अर्धपुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे.

या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या शाळेच्या शिक्षकांना तर या घटनेमुळे रडू कोसळले. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना अटक करण्याची मागणी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी केली आहे.