Dam Water Storage: राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water Storage) देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणातील पाणीसाठा 82.24 टक्क्यांवर गेला आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा हा 64.76 टक्के होता. 


कोणत्या विभागातील धरणांमध्य किती पाणीसाठा?


नागपूर विभाग - 82.36 टक्के
अमरावती विभाग - 84.64 टक्के
मराठवाडा 62.21 टक्के
नाशिक 76.67टक्के
पुणे 90.63 टक्के 
कोकण 93.40 टक्के 


कोयनेसह उजनी धरण हे 100 टक्के भरलं 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात 92.11 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी धरण 100 टक्के भरलं आहे. कोयना धरण देखील 100 टक्के भरलं आहे. मागील वर्षी याचवेळी 80.24 टक्के पाणीसाठा होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून 98.24 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याचवेळी 90.54 टक्के जलसाठा होता.


मराठवाड्यासह विदर्भाला पावसाचा मोठा फटका


मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आणि विदर्भात आज सकाळपासूनच पावसाने दाणादाण उडवून दिल्याचं पाहायला मिळालं. बुलडाणा, हिंगोली, परभणी आणि वाशिम जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून परभणीतही शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.


राज्य सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी


गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) आणि झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी केली आहे.


विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहिततीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या:


Marathwada Rain: धो-धो पावसाने जायकवाडी धरण भरलं, बीडमध्ये तुफान पाऊस, जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला