मुंबई : मुंबईसह देशभरात आज दहीहंडीचा उत्साह आहे. सुप्रीम कोर्टाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली आहे. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी या निमयमाचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे.


 

मुंबई - ठाण्यातील दहीहंडी देशभरात प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सचिन अहिर यांची , घाटकोपरमध्ये मनसे आमदार राम कदम  ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती,  शिवसेना आमदार रवींद्र फाटक - संकल्प दहीहंडी,  टेंभीनाका - एकनाथ शिंदे, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट - खासदार राजन विचारे या दहीहंडी प्रसिद्ध आहेत.

 

नौपाड्यात मनसेची 40 फुटांवर हंडी

सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाल न जुमानता मनसेनं ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल ४० फुटांवर हंडी बांधली आहे. कायदाभंग असं या हंडीला नाव देण्यात आलं असून 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मनसे ही हंडी फोडणार की त्याआधी पोलीस त्यावर कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे.

 

चेंबूरमध्ये प्रशासनाकडून मार्किंग

तिकडे चेंबूरमध्ये मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र 20 फुटांची मर्यादा पाळायला मनसेने नकार दिल्यामुळे प्रशासनाने या ठीकाणी 20 फूटापर्यंत मार्किंग करुन ठेवलं आहे. मनसेच्या दहीहंडीची उंची मोजण्यासाठी पोलिसांनी हे मार्किंग गेल्याचं समजतंय. त्यामुळे यादरम्यान मनसे नियमांचं उल्लंघन करतंय की नाही याकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे.

 

डोंबिवलीतही नियमाचं उल्लंघन

सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्यावर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतरही डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालं आहे. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने  5 थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त सलामी दिली.

 

दरम्यान या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक कुमार आवटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्याला आदर असला तरीही आमचं स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ नये असं या मंडळाचं म्हणणं आहे. त्यामुळे नवसाई पथकातले गोविंदा आज सात थर लावणार आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.

 

साईदत्तची 20 फुटांची हंडी

काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलंय. दादर परिसरातल्या साईदत्त मंडळाने नियमांप्रमाणे दहीहंडी साजरा करत 20 फुटांच्या आतच हंडी बांधली आहे.

 

काही मंडळं आणि राजकिय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायला नकार दिला होता. अशा आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचेही संकेत दिलेत. त्यामुळे पोलिस कारवाई टाळण्यासाठी काही पथकांनी 20 फुटांच्या आतच हंडी बांधायचं ठरवलं आहे.



डोळ्यावर पट्टी बांधून हंडीला सलामी

दरम्यान आजच्या दिवशी अनेक गोविंदा पथक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतायत. जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली. आपल्या सरावाचं कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे.