डोंबिवली : सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्यावर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतरही डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालं आहे. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने पाच थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर सलामी दिली. दरम्यान या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक कुमार आवटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्याला आदर असला तरीही आमचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ नये असं या मंडळाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे नवसाई पथकातले गोविंदा आज सात थर लावणार आहेत, असंही आवटे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंदा पथकावर कोणती कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टानं दहीहंडी नियमांच्या अटीसंदर्भातील पुनर्विचार याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. जोगेश्वरीमधील जय जवान या पथकानं यासंदर्भातली याचिका दाखल केली होती. ज्यात 20 फुटांपेक्षा अधिकचे थर लावण्यात मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दहीहंडी थराने नाही, तर आता मिसाइलने फोडायची का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. सण सणासारखा साजरा झाला पाहिजे, या शब्दांत राज यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. गोविंदा पथकांशी कोणतीही चर्चा न करता राज्य सरकारने घेतलेला निर्णय घेतला, हा निर्णय म्हणजे सरकारचं पळपुटे धोरण असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ठाण्याच्या नौपाडा परिसरात मनसेकडून 9 थरांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. नऊ थरांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यासंदर्भातले होर्डिंग्ज ठाण्यात काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे 20 फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडीचे थर लावू नयेत, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश पायदळी तुडवले जाण्याची चिन्हं आहेत.
‘देशात हिंदूंनी त्यांचे सण-उत्सव साजरे करणं हाच मुळात अपराध आहे.’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं आपल्या सामना या मुखपत्रातून केली आहे. ‘न्यायालयीन निर्णयामुळे गोविंदा मध्येच लटकलेले आहेत. लोकांनी निवडून दिलेलं सरकार हात चोळत बसलं असून कोर्टच राज्यकारभार करीत आहे.’ अशी थेट टीका करीत सेनेनं भाजपवरही निशाणा साधला आहे.