चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक विधान केलेय. गुजरातमध्ये जसे गोध्रा हत्याकांड झाले तसेच अयोध्येतून परतणाऱ्या कारसेवकांसोबत होऊ शकते. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर चढण्याची शक्यता आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. इतकेच नाही तर, आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देशात दंगलींचे सत्र सुरू झाले असून धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर सत्तेत येण्याचा भाजपचा इतिहास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलेय. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


दंगली पेटविल्याशिवाय भाजप सत्तेत येवू शकत नाही. गुजरातमधील गोध्रा कांडनंतर देशात भाजपला बळ मिळाले होते. देशात पुन्हा सत्ता मिळत नाही, याची जाणीव झाल्याने भाजप सरकार आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत आहे.  जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होतील. रामलल्लाचे दर्शन घेवून कारसेवक निघतील तेव्हा दंगली घडविल्या जातील. यात काही कारसेवकांचा जीव जाईल. त्यावर देशातील सत्तेसाठी दावा ठोकला जाईल, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय.


गिरीष महाजन काय म्हणाले ?


तुम्ही सध्या संवैधानिक पदावर आहात. विधाने करताना काळजी घ्या. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बालिश वक्तव्य करू नका, असा सल्ला गिरीष महाजन यांनी वडेट्टीवर यांना दिलाय. 


तुम्ही आता असं विधान केलेलं आहे की प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त आयोध्येला जातील आणि येताना दंगली भडकतील. मोठ्या संख्येने श्रीराम भक्त अयोध्येला जातील आणि येताना दंगली भडकतील अशी जर तुमच्याकडे काही गुप्त माहिती असेल तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना किंबहुना देशाच्या गृहमंत्रणअशी जर तुमच्याकडे काही गुप्त माहिती असेल तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना किंबहुना देशाच्या गृहमंत्रण द्या ते सक्षम आहेत मात्र असे विधान करून तुम्ही समाजामध्ये दुपडी निर्माण करण्याचं काम करताय कृपया असं विधान करू नका, असे महाजन म्हणाले.



उदय सामंत यांनीही वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार घेतलाय -


राजकारण करावं मात्र इतक्या खालच्या स्तरावर जाणं चुकीचं आहे. ज्यांची राम मंदिर बनवून दाखवलं, त्याबद्दल अभिमान असला पाहिजे. जिथे काहीच घडणार नाही तिथे गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. राम मंदिर बांधल्यानंतर सर्वांमध्ये उलट चैतन्य येणार आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. 


सर्व माहिती असताना विरोधी पक्ष नेत्याकडून असे वक्तव्य येणं चुकीचं आहे. शासन कुठे चुकते हे सांगा मात्र अशाप्रकारची विधानं करणं चुकीचं आहे. विरोधी पक्षनेते पद आल्यानंतर मी कसं आक्रमक बोलतोय हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत, असे सामंत म्हणाले. 


आमची सत्ता आल्यास भाजपच्या लोकांना जशास तसे उत्तर दिले जाईल : विजय वडेट्टीवार


गेले काही दिवस राज्यातील सत्ताधाऱ्यांवर सातत्याने प्रहार करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना आता आपल्यावर कारवाईची ब्याद मागे लागेल अशी भीती वाटत आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर चंद्रपूर शहरात प्रथम आगमन प्रसंगी वडेट्टीवार यांचा पक्षाच्यावतीने गांधी चौकात जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केलेल्या भाषणातून त्यांनी आपण भाजपला भीत नाही. भाजपवाल्यांचीही पापं आपल्याला माहीत असल्याचा दावा केला. आमची सत्ता आल्यास भाजपच्या लोकांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा प्रहार त्यांनी केला. वडेट्टीवार याला यासाठीच हायकमांडने मोठी जबाबदारी दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.