नांदेड : नांदेड जिल्ह्यात 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 22 मार्च मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार (8 मार्च 2021) सकाळी 6 वाजल्यापासून ते 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहतील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास परिसरात जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त जणांना जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
गेल्या काही दिवसात देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येतंय. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळालं असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून रविवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 11,141 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 97,983 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारने काय करावं?
कोरोना रुग्णसंख्य झपाट्याने वाढत असताना त्यावर लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घ्यावा, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा आणि लसीकरण सुरू ठेवावे असंही केंद्रीय पथकाने सुचवलं आहे.