अहमदनगर : केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हाहाःकार माजवला आहे. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये घर, शेती आणि जनावरं दगावल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
श्रीगोंदा तालुक्यात आढळगाव, काष्टी, चांडगाव आणि गारसह पंधरा वाड्या-वस्त्यांना वादळाचा फटका बसला. तालुक्यात आतापर्यंत 346 घराचं पत्रे आणि भिंती पडून नुकसान झालं आहे. पत्रे उडाल्याने आणि घरं पडल्याने दहा जण जखमी झाले आहेत. तर दोन गाय, दोन शेळ्या आणि एक रेडकू दगावलं.
या वादळात पोल्ट्रीचं शेड आणि पॉलीहाऊसही जमीनदोस्त झालं. साधारणपणे दहा घरांच्या नुकसानीचा आणि मृत जनावरांच्या आकडा सोळा लाखाचा आहे. अजून पंचनामे सुरु असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
वादळाने दहा जण जखमी
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव, काष्टी, आढळगाव, चिखलठणवाडी, कणसेवाडीसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या वादळात चांडगावला तीन, ढोरजे गावात पाच आणि अजनुजला दोन पोल्ट्री कर्मचारी जखमी झाले. घरांचा पत्रा आणि दगडविटा अंगावर पडल्याने हात, पायाला आणि शरीराला जखम झाली आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.
वादळात 346 घरांचं नुकसान
काष्टीत 80 घरांचे पत्रे उडाले, तर गारला 40 घरांचे, सांगवीला 35, चांडगावला 60 आणि मुंढेकरवाडीला 20 घराचे पत्रे उडून भिंती पडल्या. त्याचबरोबर कणसेवाडीत 14, चिखलठणवाडी 16 आणि अजनुज 31, तर आनंदवाडीत 32 घरांचं पत्रे उडून नुकसान झालं.
फळबागा, पॉलीहाऊस आणि पोल्ट्रीला फटका
वादळाने डाळिंब आणि लिंबाच्या फळबागा उन्मळून पडल्या. डाळिंबाने लगडलेली झाडं आणि लिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. तर कणसेवाडीत पॉलीहाऊचं आणि अजनुजला पोल्ट्रीचं नुकसान झालं. एकीकडे बाजारभाव नाही, त्यातच वादळाने हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
घरांचं नुकसान, संसार उघड्यावर
घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अन्नधान्यात माती मिसळली असून जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागरिकांना अक्षरशः खाण्यासाठीही काही उरलेलं नाही. गॅसची शेगडी, भांड्यांवर दगडमाती पडल्याने आर्थिक फटका बसला आहे.
वीजपुरवठा खंडित
चांडगावला दोन, तीन घरांवर विजेचे पोल आणि तारा पडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झालाय. अजून दोन ते तीन दिवस वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे याचा फटका पुन्हा शेतीला बसणार आहे.
अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत, तर काही ठिकाणी झाडं घरांवर पडल्याने नुकसानीत भर पडली आहे.
शाळांचे पत्रे उडाले
शाळांचे पत्रे उडाल्याने आता मुलांच्या शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात याच धोकादायक शाळांत मुलांना जीव मुठीत धरुन शिक्षणाची वेळ आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी महसूल विभागाने नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करुन निकषानुसार आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
नगरला वादळी वाऱ्याचा कहर, कोट्यवधी रुपयांचं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 08:39 PM (IST)
वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हाहाःकार माजवला आहे. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये घर, शेती आणि जनावरं दगावल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -