गोंदिया : गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारी पदासह जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याजागी नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. काल 28 मे रोजी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी अभिमन्यू काळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात होते.


भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल 450 ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवडणुकीच्या कामातून बाजूला करण्यात आलं आहे.

नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएमचा घोळ गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना भोवल्याचं बोललं जात आहे.

भंडारा-गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु: काळे


भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली होती.

भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ईव्हीएम बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना ताटकळत राहावं लागलं होतं. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे, गोंदियातील 35 केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं वृत्त आलं होतं.  मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते वृत्त फेटाळलं होतं.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, 35 केंद्रावरील मतदान रद्द केल्याची माहिती आल्यानंतर, त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्पष्टीकरण देत, कुठेही मतदान रद्द झालं नसल्याचं सांगितलं होतं.

शेवटचा मतदार मतदान करेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरुच राहील, असंही अभिमन्यू काळे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचा आक्षेप

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही आक्षेप घेतला होता.

भंडारा - गोंदिया मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 13.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.

भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.