सांगली : कृष्णा नदी पात्रात सांगलीतील पद्माळे गावाजवळ 12 ते 15 फुटी मगरींचं आज सकाळी नागरिकांना दर्शन झालं. कित्येक वेळ ही मगर नदी काठी येऊन निपचित पडली असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.


सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर मगरी नदी पात्राबाहेर पडत आहेत. यामुळे पद्माळे गावातील नागरिक भयभीत झाले असून नागरिकांना नदी काठी असलेल्या शेतात जाणंही मुश्कील झालं आहे.

कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे, तर काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर आलं आहे. त्यामुळे मगरी पात्राबाहेर येत आहेत. लोकांनी नदी काठी असलेल्या शेतात जाणं टाळावं, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

पळूस तालुक्यातील सूर्यगाव येथेही परवा नदी शेजारील असलेल्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून मगरींचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत होतं. या शेतात दोन दिवस मगरीचा ठिय्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये मगरीची दहशत पसरली आहे.

या ठिकाणी मगरीने अंडी घातली असण्याचा अंदाज गावकऱ्याकडून वर्तवला जात आहे. या कृष्णा नदीकाठावर वारंवार होण्याऱ्या या मगरीच्या दर्शनामुळे संपूर्ण कृष्णा नदीकाठी भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, 20 एप्रिल रोजी पळूस तालुक्यातील ब्रम्हणाळ येथे मगरीने 14 वर्षांच्या मुलाला नदीत ओढलं होतं. नंतर या मुलाचा मृतदेह सापडला होता.