बारामती: मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर आज बारामतीतील एका मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने अपशब्द वापरत टीका केली. दिलीप रामचंद्र शिंदे या व्यक्तीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर वैयक्तीक टीका केली आहे. त्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी या व्यक्तीने केलेल्या टीकेबाबत पोस्ट लिहून त्याच्याशी आपल्या पक्षाचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे अजित पवारांची पोस्ट?
अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'श्री. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. मराठा समाजासाठी आरक्षण विषयक मागण्या विविध स्तरावर ते लावून धरत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी एक चळवळ उभी केलेली आहे. आज बारामतीतील एका व्यक्तीने श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही अपशब्द वापरलेले आहेत. त्यांच्या वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. अशा प्रकारे वैयक्तिक टीका टिप्पणी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही', असं ते म्हणाले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप रामचंद्र शिंदे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आहे. गेली तीस ते चाळीस वर्षे मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांनी आंदोलने केली. पंरतू आता एक चार ते पाच वर्षांपुर्वी एक जरांगे नावाचा बांडगुळ मराठा समाजामध्ये धुरी माजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे आरक्षण 1980 ते 90 पासून महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी आहे. त्यावेळच्या सरकारचा विचार केला, तर त्यावेळी असलेलं काँग्रेसचं सरकार आणि शरद पवारांचं सरकार होतं. हे सरकार असताना1994 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते."
"शरद पवार सरकारने किंवा त्यावेळच्या दुसऱ्या काँग्रेस सरकारने जर दाखले दिले असते. तर आमच्या तीन ते चार पिढ्या बरबाद झाल्या नसत्या. शरद पवारांच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन झाली. परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आता या उलट आपण पाहिलं तर गेले दोन वर्ष एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस अजित पवार हे महाराष्ट्राचं सरकार चालवतात आणि त्या माध्यमातून त्या सरकारने जे कुणबी दाखले शोधण्याचा प्रयत्न केला. खरंतर, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन ते तीन कोटी दाखले मराठा समाजाच्या लोकांना कुणबी दाखले मिळाले त्या माध्यमातून काय फायदा झाला. आज ते कुणबी दाखले मिळाल्यामुळे ओबीसीमध्ये मिळणाऱ्या एमपीएससी, यूपीएससी किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा आहेत. जे काही शासकीय आरक्षण असेल त्या माध्यमात त्याचा फायदा मिळाला आहे. पण, हेच आरक्षण दर 1980 किंवा 1990 साली मिळालं असतं किंवा कुणबी दाखले शरद पवारांच्या सरकारमध्ये किंवा त्या वेळच्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी दाखले दिले असते. तर आज आमच्या तीन ते चार पिढ्या बरबाद झाल्या नसत्या ही चूक खरंतर शरद पवार आणि काँग्रेस यांची आहे. पण हे जरंगे पाटील कधीच बोलत नाही.
"जरांगे पाटलांना हे सांगण्याची गरज आहे. ते आंदोलन करतात ते या माध्यमातून मराठा समाजामध्ये दूरी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. पण, उद्धव ठाकरे सरकारच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनाही आरक्षण टिकवता आलं नाही. आज जरांगे पाटील हे विधानसभेच्या माध्यमातून याला पाडा त्याला पाडा हीच भूमिका घेत आहेत. हे त्यांना कळलं नाही गेली 30-40 वर्ष मराठा आरक्षणाला कोणी झुलवत ठेवलं. हा, मात्र त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही हा कोणत्या माध्यमातून चालतो. देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना दोष देण्याचं काम जरांगे पाटील करत आहे. मात्र, त्याच्यापासून महाराष्ट्रातील तमाम तरुणांनी मराठा समाजाच्या लोकांनी त्यांची सर्वांनी साथ सोडली पाहिजे. खरंतर मराठा समाजासाठी हा आंदोलन करतोय. मग याने राजकीय क्षेत्रात भाग घेणे गरजेचे नाही. आज जो तो भूमिका मांडत आहे. त्याला पाडा याला पाडा मी सांगेल त्याला पाडा ही पद्धत चुकीची आहे. हा काही सामाजिक कार्यकर्ता होत नाही. याच्या पासून लोकांनी सावध राहायला पाहिजे आज आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचार केला तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं. अन्यथा मला वाटत नाही की कोणता सरकार मराठा आरक्षणाला देऊ शकेल".