हिंगोली : दसऱ्याच्या दिवशी कोरोनामुळं तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंपरागत पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो. या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंना पालखीतून फिरवले जाते. नागनाथ मंदिरातून नागनाथाची बहीण महाकाली यांचा झेंडा घेऊन पालखी मार्गस्थ होत असते. दरवर्षी या पालखीमध्ये मानकरी, भजनी मंडळ, विश्वस्त वाजंत्री , पंचक्रोशीतील भक्तांची उपस्थिती असते  मंदिरातून निघालेली पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोनं लुटण्यासाठी ही पालखी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडाची सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते.


यावर्षी पालखीचा हा सोहळा कोरोनामुळं रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी ही पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले होते. मात्र सत्ताधारी आमदारांकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याने हिंगोली जिल्ह्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ मंदिरात सपत्नीक नागनाथाची पूजा केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.


टाळेबंदीचे नियम कुणासाठी? राजकीय नेत्यांना नियम नाहीत का?

पालखी काढल्याप्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 बांगर यांनी आधीही केली होती पूजा
आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक औंढा नागनाथ येथे पहाटे जाऊन पूजा केली होती. या पूजेच्या वेळी सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला नव्हता. या संदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले होते. या पूजेवेळी ना पुजाऱ्याच्या तोंडावरती मास्क होता ना आमदार साहेबांच्या तोंडावर.  यासंदर्भात आम्ही मंदिर संस्थांचे पदाधिकारी म्हणून तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता तरी आमदार संतोष बांगर हे मंदिर संस्थानचे एक सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना पूजेची परवानगी दिली असा युक्तिवाद केला होता.