डोंबिवली (ठाणे) : ‘सांस्कृतिक नगरी’ म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात मागील वर्षभरात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन महिन्यांत डोंबिवलीत तीन हत्या झाल्या असून, या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत.

डोंबिवलीतल्या गेल्या वर्षभरातील गुन्ह्यांचा इतिहास :

  • 4 एप्रिल 2017 सुरेश मंचेकर टोळीचा गुंड विठ्ठल नवघरे याची चाकूने भोसकून हत्या

  • 9 मे 2017 ठाकुर्लीत घराच्या दुरुस्तीचं काम घेण्याच्या वादातून किशोर चौधरी आणि महिमादास विल्सन यांची हत्या

  • 13 मे 2017 मानपाड्यात कैऱ्या तोडण्याच्या वादातून पुतण्या जयेश म्हात्रे याने सख्खा काका गणपत म्हात्रे यांच्यावर केला गोळीबार

  • 20 मे 2017 नगरसेवक वामन म्हात्रे यांचा भाऊ बाळा म्हात्रे यांना घरात घुसून बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी

  • 26 मे 2017 दत्तनगर भागात डॉ. शिरीष जोशी यांच्यावर दोन तरुणांनी वार करून बंदूक दाखवत दिली जीवे मारण्याची धमकी

  • 30 मे 2017 आयरे गावात जागेच्या वादातून विक्रांत उर्फ बाळू केणे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या


डोंबिवलीत मागील दोन महिन्यांत घडलेल्या या घटना पाहिल्या तर डोंबिवलीची सांस्कृतिक नगरी म्हणून असलेली ओळख किती झपाट्यानं लोप पावत चालली आहे, याचा सहज प्रत्यय येतो.

एप्रिल आणि मे महिन्यात ज्या वेगाने डोंबिवलीत गुन्हेगारी घटना घडल्या, त्या रोखण्यात पोलीसही सपशेल अपयशी ठरले आहेत. डोंबिवलीत 90 च्या दशकात गाजलेल्या केएमसी टोळी आणि नवनाथ टोळीच्या युद्धाच्या आठवणी यानिमित्तानं ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी हमखास मंगळवारीच खून व्हायचे आणि आताही मंगळवारीच दोन खून झाले आहेत. त्यामुळे मंगळवार डोंबिवलीकरांसाठी धडकी भरवणारा ठरु लागला आहे.

शहरात सध्या सुरू असलेले अवैध धंदे, बेसुमार रेती उपसा, त्यातून शहरात वाढलेला गुंडांचा वावर, यामुळे आता डोंबिवलीची गुन्हेगारी शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. त्यात भर म्हणून डोंबिवलीत सध्याच्या घडीला 668 जणांकडे परवानाधारक बंदुका आहेत. या सगळ्यांना खरंच बंदुकांची गरज आहे का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.