सोलापूर : भाजप नगरसेवक आणि त्याच्या साथीदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या मटका अड्यावर आज सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. मात्र पोलिस आल्याची माहिती कळताच पळून जाण्याच्या प्रयत्नाने इमारतीवरुन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय. सोलापुरातील न्यू पाच्छा पेठ परिसरातील कुंचिकोरवे गल्ली या ठिकाणी भाजप नगरसेवक सुनील कामाठी, त्याचे भागीदार आणि कामागारमार्फत मटक्याचा अड्डा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे कुंचिकोरवे गल्ली येथील मातृछाया या इमारतीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. बिल्डींगच्या समोरच्या बाजूच्या जिन्याने पोलिसवर जात असल्याची माहिती बिल्डींगमध्ये मटक्याचा व्यवसाय करणाऱ्या आरोपींना मिळाली. पोलिस आल्याचे लक्षात येताच जिन्याच्या पहिल्या मजल्यावर जुगार खेळत असलेले आणि मटक्याचा हिशोब घेत असलेले काही जण पाठीमागील दरवाजा उघडून उडी मारुन पळून गेले. त्यापैकी परवेज ऊर्फ बब्बू नुरोद्दीन इनामदार ( 42 वर्षे रा. नई जिंदगी परिसर) याने देखील उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र उडी मारल्यानंतर डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच परवेज याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाताच पोलिस उपायुक्त बापू बांगार, सहाय्यक आयुक्त के. एस. ताकवले यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. कुंचीकोरवी गल्ली येथे मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. तर शासकीय रुग्णालय येथे देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. रात्री उशिरापर्यंत स्वत: उपायुक्त बापू बांगार हे पंचनाम्याकरिता उपस्थित होते.
सविस्तर पंचनाम्यानंतर परवेज ईनामदार याच्या मृत्यूबाबत अक्समात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर मटका अड्ड्यावर झालेल्या कारवाईतून 22 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी मोबाईल, हिशोबाच्या 200 नोंद वह्या, मोटार सायकली आणि गुह्यात वापरलेले इतर सर्व साहित्य जप्त केले आहे. तर पळून गेलेल्या इतर 16 ते 18 आरोपींचा शोध देखील पोलिस घेत आहेत. या प्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायदा, साथरोग प्रतिबंध कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे नगरसेवक सुनिल कामाठी, पोलिस कर्मचारी स्टिफन स्वामी आणि इतर सुमारे 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर शहरात पोलिस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे रुजू झाल्यापासून अवैध धंदे काही प्रमाणात बंद झाल्याचं दिसून येत होते. मात्र मागील काही दिवसात अवैध गुटख्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात उघडकीस आला आहे. तर मटका बंद झाला आहे अशी चर्चा सुरु असताना आजच्या घटनेमुळे मटका देखील सुरुच असल्याचे उघडकीस आले आहे. मागील काही दिवसांपासून सोलापुरातील सावकारीवर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. नगरसेवक सुनील कामाठी हे अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे आणखी किती जण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करतात त्यांचा शोध घेण गरजेचं असून अशा अवैध धंद्यावर 'अंकुश' ठेवणे महत्वाचे आहे.