मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या क्रिमीलेयरची मर्यादा पाच लाख करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचा गट आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या क्रिमीलेयर उत्पन्नाची मर्यादा पाच लाख करण्याची मागणी केली होती. खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांची उत्पन्न मर्यादा फक्त एक लाख आहे, तर ओबीसींमधील आर्थिक मागासांची मर्यादा सहा लाख आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना बऱ्याच सुविधांना मुकावं लागतं.
आज शिवसेनेच्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन क्रिमीलेयरमधील तफावत देवेंद्र फडणवीसांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसंच खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांच्या क्रिमीलेयरची मर्यादा 5 लाख करण्याचा पाठपुरावाही करणार आहे. आर्थिक मागासांच्या मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवत प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहाची मागणीही करणार आहे.