लातूर : वाढत्या कोरोनाच्या काळात आरोग्य, पोलीस कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोविड सेंटर बंद होत आहेत. परिणामी कोविड सेंटरमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली असून आता शासनाने या कर्मचाऱ्यांचा विचार करावा तसेच नोकर भरतीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कोडिव योद्धांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.


कोरोना काळात लातूर जिल्ह्यात 51 कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या सेंटरमध्ये 485 पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. यामुळे 47 कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. आजमितीला उदगीर येथे एक आणि लातूर शहरात तीन असे चारच सेंटर सुरू आहेत. यात आवश्यक असणारे 240 कर्मचारी हे सेवा करीत आहेत. तर बाकीच्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर या काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गाजावाजाही झाला. थेट कोरोना रुग्णांशी संबंध येत असतानाही त्यांनी जीवाची बाजी लावून सेवा केली आहे. मात्र, आता हातातील काम गेलं आहे.


या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच अनुषंगाने सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे, शासनाच्या विविध विभागातील जागा कोविड योद्धांसाठी राखीव ठेवाव्यात, ज्याप्रमाणे हंगामी क्षेत्रात 10 दिवस जरी काम केले तरी त्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के आरोग्य सेवेत प्राधान्य दिले जाते. त्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांनाही प्राधान्य द्यावे शिवाय सध्या रिक्त असलेल्या जागांवर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील कोरोना योद्धांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्याअनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांना निवेदनही दिले आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु, निर्णय झाला नाही. पण सद्यस्थितीत जवळपास सर्वच कोविड सेंटर हे बंद होत असल्याने कर्मचाऱ्यांची मागणी अधिक तीव्रतेने होत आहे. मात्र, कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक झाली असताना आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहावे लागणार आहे.


कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही पुढे आलो. ज्यावेळी कोणीही पुढे येत नव्हते त्यावेळी आम्ही आलो. आता कोरोनाचा प्रादुभाव ओसरत आहे. कोविड सेंटर बंद होत आहेत. आम्हाला कामावरून कमी केले आहे. ज्याप्रमाणे सरकारने 90 दिवस फवारणी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यास एक प्रमाणपत्र दिले आहे. आरोग्य विभागात जागा निघाल्या तर त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल, तसा निर्णय आमच्यासाठी ही सरकारने घ्यावा असे मत कामावरून कमी करण्यात आलेल्या भागवत गवळी यांनी व्यक्त केले आहे.


#CORONA कोरोनाचा नवा प्रकार किती घातक? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब थोरात यांच्याशी बातचीत